
महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर ‘हे राज्य मराठी माणसांचे असेल की मराठा माणसांचे?’ असा परखड सवाल ग.त्र्यं. माडखोलकरांनी यशवंतराव चव्हाणांना विचारला होता. यशवंतरावांनी देखील तेवढ्याच आत्मविश्वासाने आणि बहुजनवादी वैचारिक प्रग्लभतेतून ‘हे राज्य मराठी माणसांचे होईल’ असे उत्तर दिले होते. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुरोगामी व परिवर्तनवादी वारसा अगदी दमदारपणे पुढे चालवला जाईल, अशी ग्वाही यशवंतरावांनी दिली होती. 'समाजवादाचा पाळणा पहिल्यांदा महाराष्ट्रात हलेल' असे यशवंतरावांनी म्हटले होते. आधुनिक महाराष्ट्राच्या निर्मितीची उर्मी घेऊन संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडून यशवंतरावांनी स्विकारला होता. यशवंतरावांसारखे सुसंस्कृत, नीतिमान व पुरोगामी वैचारीक बैठक असलेले कर्तृत्ववान नेतृत्व राज्याला लाभले होते. त्यांनी अनेक चांगल्या व आदर्श संसदीय प्रथा, परंपरा सुरु केल्यात, अनेक सामाजिक, राजकीय, आर्थिक सुधारणांची मुहूर्तमेढ रोवली. यांना यशवंत परंपरा असे म्हणतात. राजकारणातील या मर्यादा पुरुषोत्तमाच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा.
यशवंतराव चव्हाण यांचा जन्म १२ मार्च १९१३ रोजी सातारा जिल्ह्यातील देवराष्ट्र येथे झाला. "कृष्णाकाठ" हे त्यांचे आत्मचरित्र मराठी साहित्यातील एक अनमोल ठेवा आहे, त्यांना आयुष्यभर भेटलेल्या विविध क्षेत्रातील व्यक्तींचे व्यक्तिमत्व यावर त्यात लेखन आहे. राजकारणी व्यक्ती म्हटले की, गुण-दोष, राजकीय मतभेद, टीका, राजकीय क्षत्रुत्व आलेच, पण या सर्वांच्या पलीकडे त्यांचे जीवन होते. सर्वसामन्य कुटूंबात जन्मलेल्या या महान व्यक्तीचा "अजातशत्रू" असाच उल्लेख करावा लागेल. बालपणापासून त्यांच्यावर त्यांच्या मातेचे "विठाईचे" संस्कार झाले होते. त्यांनी व्यक्ती-व्यक्तीतील गुणग्राहकता राजकीय मतभेदांच्या पलीकडे जपली. भाषणांत व्यक्तिगत टीका तसेच पातळी कधीही सोडली नाही. नाटक, सिनेमा, साहित्य संमेलानातील त्यांची उपस्थिती व त्यात असलेली त्यांची रुची वाखाणण्याजोगी होती. अनेक नाटकांच्या प्रयोगानंतर विंगेत जाऊन कलाकारांना ते कामाची पावती देत असत. ते जर राजकारणात आले नसते तर एक उत्तम साहित्यिक झाले असते. कार्यकर्त्यांना आलिंगन देऊन आपलेसे करण्याची त्यांची एक आकर्षक शैली होती. त्यांनी नेहमीच बेरजेचे राजकारण केले. माणूस जोडण्याची त्यांच्यात विलक्षण हातोटी होती. त्यांच्या पत्नी वेणूताई या सावलीप्रमाने सुख दु:खद त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्यात. सन १९५६ मध्ये स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली. तसेच मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर १ मे, १९६० महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणूनही त्यांची झालेली निवड हा एक बहुमानच होता. सन १९६२ मध्ये भारत चीन युद्धाच्या संकट काळात तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी मोठ्या विश्वासाने यशवंतरावांची देशाच्या संरक्षणमंत्री पदावर केलेली निवड हा त्यांच्या कारकीर्दीचा सर्वोच्च बिंदू म्हणता येईल. त्यावेळी वर्तमानपत्रातील मथळा 'हिमालयाच्या संरक्षणासाठी सह्याद्री धावून आला' असा होता. पुढील काळात त्यांनी उपपंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री ही पदे यशस्वीरीत्या भूषविली. केंद्रात जनता पक्षाचे सरकार असताना (१९७७-७८) ते विरोधी पक्षनेते होते. तसेच पुढे ते आठव्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्षही झाले.
यशवंतराव चव्हाण यांचे राजधानी दिल्लीत २५ नोव्हेंबर १९८४ रोजी निधन झाले तेव्हा, त्यांच्या बॅंकेच्या खात्यात अवघे २४ हजार रुपये शिल्लक होते. त्यांच्या नावावर एक गुंठा जमीन देखील नव्हती. आजचा सत्तेचा घोडेबाजार बघून राजकारणातील मर्यादा पुरुषोत्तम असलेल्या चव्हाण साहेबांची महाराष्ट्राला प्रकर्षाने आठवण येत आहे. चारित्र्यसंपन्न, कुशल राजकारणी, गुणांची पारख असणारे उत्तम रत्नपारखी, साहित्यिक, जाणता राजा, महाराष्ट्र पुत्र यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पवित्र स्मृतीस यांना विनम्र अभिवादन II
✍🏻 शब्दांकन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, ९९२१९७६४२२
