
हिमायतनगर (शेख मुजम्मील): महावितरण प्रशासनाने दिलेली आश्वासने हवेत विरल्याने, हिमायतनगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांच्या नेतृत्वाखाली ०९ मार्च २०२६ पासून दुसऱ्यांदा बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. शहराच्या सुरक्षिततेसाठी आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी हे आंदोलन पुकारले असून, जोपर्यंत प्रत्यक्ष कारवाई होत नाही, तोपर्यंत माघार घेणार नसल्याचा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला आहे.
या आहेत प्रमुख ११ मागण्या:
धोकादायक खांब हटवा: एक्सप्रेस फिटर ३३ के.व्ही. चे पोल ५ ते ६ फूट अंतरावरून काढून ५० फूट अंतरावर हलवण्यात यावेत.
अनधिकृत कामांची चौकशी: शहरात विनापरवाना केलेल्या ३३ के.व्ही. लाईनच्या कामाची खातेनिहाय चौकशी व्हावी.
वाढीव वीज बिले: चुकीची आणि वाढीव वीज बिले दुरुस्त करून रीडिंगप्रमाणेच बिले देण्यात यावीत.
रस्ते मोकळे करा: मारुती मंदिर पांदण रस्ता आणि हिंदू स्मशानभूमी जवळील डीपी (DP) तत्काळ हटवून रहदारीचा अडथळा दूर करावा.
भ्रष्टाचार रोखा: शेतकऱ्यांकडून पैसे उकळणाऱ्या कंत्राटदारांवर आणि महावितरणच्या दोषी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी.
प्रशासनाला दिला इशारा:
गेल्या वेळी केवळ आश्वासनांच्या जोरावर उपोषण मागे घेण्यात आले होते, मात्र यावेळेस ठोस निर्णय झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही, असा इशारा वडगावकर यांनी दिला आहे. जर उपोषणकर्त्यांच्या आरोग्यास काही अपाय झाला, तर त्यास संपूर्णपणे महावितरण प्रशासन जबाबदार असेल, असेही निवेदनात म्हटले आहे.
