
नांदगाव (प्रतिनिधी): नांदगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी घडणाऱ्या चोरीमुळे सामान्य नागरिक तसेच व्यापारी वर्गामध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या सूचनेनुसार शासकीय अधिकारी, पोलीस प्रशासन, व्यापारी आणि नागरिक यांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली.

या बैठकीत शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होणे हे शहराच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. मात्र, वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये चिंता वाढत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

बैठकीदरम्यान नागरिक व व्यापाऱ्यांनी आपले अनुभव आणि सूचना मांडल्या. त्यावर प्रशासनाने परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही ठोस उपाययोजना राबविण्याचे आश्वासन दिले. त्यामध्ये शहरात नियमित गस्त वाढविणे, सीसीटीव्ही यंत्रणेचा प्रभावी वापर करणे, तसेच नागरिकांशी सातत्याने संवाद ठेवणे अशा उपाययोजनांचा समावेश आहे. याशिवाय नागरिकांनीही सतर्क राहून संशयास्पद हालचालींबाबत तात्काळ पोलीस प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले.

आमदार सुहास कांदे यांच्या नांदगाव येथील निवासस्थानी झालेल्या या बैठकीस सौ. अंजुमताई कांदे, युवासेना जिल्हाप्रमुख फरहान दादा खान, नांदगाव शहराचे नगराध्यक्ष सागर हिरे, डी.वाय.एस.पी. बाजीराव महाजन, अप्पर पोलीस निरीक्षक संधू, तसेच नांदगाव–मनमाड शहरातील पोलीस अधिकारी व व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी अंजुमताई कांदे आणि फरहान खान यांनी पोलीस प्रशासनाने तात्काळ ठोस उपाययोजना करून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली. तर नगराध्यक्ष सागर हिरे यांनी नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने घेऊन कोणताही हलगर्जीपणा होऊ नये, असे सांगितले.

दरम्यान, नांदगाव कार्यक्षेत्रातील पोलीस ठाण्यांतून प्रत्येकी दोन पोलिसांचा समावेश असलेली विशेष टास्क फोर्स लवकरच स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती डी.वाय.एस.पी. बाजीराव महाजन यांनी दिली. ही टीम चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष काम करणार असून परिस्थिती सुधारण्यासाठी कठोर पावले उचलली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. अप्पर पोलीस निरीक्षक संधू यांनीही स्थानिक पोलीस प्रशासनाला या प्रकरणात अधिक लक्ष देण्याच्या सूचना दिल्या.
बैठकीनंतर फरहान खान आणि नगराध्यक्ष सागर हिरे यांनी पोलीस अधिकाऱ्यांसह शहरातील चोरी झालेल्या घटनास्थळांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
