

लेखक:- डॉ.गोरखनाथ सुकदेव देवरे
रिटायर्ड मेडिकल ॴॅफिसर ,स्वामी विवेकानंद नगर,येवला रोड, नांदगाव जि.नाशिक
॥आत्मा मालिक। गुरु ओम् गुरु ओम्॥ हरिपाठ चिंतन अभंग-१२, “
तीर्थ व्रत नेम भावेंविण सिध्दी। वायांचि उपाधि करिसी जनां ॥१॥
भावबळें आकळे येऱ्हवीं नाकळे । करतळीं आंवळे तैसा हरि ॥२॥
पारियाचा रवा घेतां भूमीवरी । यत्न परोपरी साधन तैसें ॥३॥
ज्ञानदेव म्हणे निवृत्ति निर्गुण । दिधलें संपूर्ण माझे हातीं ॥४॥
अनेक साधक अनेक प्रकारचे तीर्थ, व्रत, नियम करीत असतात। ईश्वराच्या ठिकाणी पूर्ण भाव असला तरच या व्रतांचे फळ मिळते। जर भाव नसेल तर ही साधने, उपाय करणे म्हणजे केवळ दंभ आहे। उपाधी वाढवणारे आहे। ईश्वरभक्ती न करता कितीही तीर्थयात्रा केल्या, कितीही व्रते केली तरी ईश्वर प्राप्ती होत नाही। मी खूप तीर्थयात्रा केल्या, व्रते केली असा वृथा अहंकार उत्पन्न होतो, तोच अध्यात्मात घातक आहे। परमेश्वर या उपाययांनी प्राप्त होत नाही। देव एकनिष्ठ भावाने प्राप्त होतो। दृढ भाव, श्रध्दा, विश्वास, एकनिष्ठ भक्तीभाव हेच श्रेष्ठ आहे। “तुका म्हणे भक्तीभाव। तोचि देवांचाही देव॥१॥” न काष्ठे विद्यते देवो, न पाषाणे न मृण्मये। भावे हि विद्यते देवस्तस्माद् भावो हि कारणम्॥१॥ देव लाकडात नाही, दगडात नाही, मातीत नाही, पण जेथे भाव आहे, तेथेच देव आहे।
भावबळें आकळे येऱ्हवीं नाकळे । करतळीं आंवळे तैसा हरि ॥२॥ भगवान केवळ शुध्द भावानेच आकळला जाणारा आहे। त्याशिवाय इतर साधनांनी तो वश होत नाही। भावापुढे बळ नाही कोणाचे सबळ॥१॥ भगवान श्रीकृष्ण सांगतात, भक्ती एक जाणे। तेथ सान थोर न म्हणे। आम्ही भावाचे पाहुणे। भलतेया॥ज्ञानेश्वरी-९-३९५॥ भाव बळ म्हणजे भावाचे बळ, सामर्थ्य। आवळा हातात जसा सहज धरता येतो, करतलामलकवत् तसा भक्तीमार्गाने ईश्वर सहज प्राप्त होतो। सात्विक भाव-“चित्त चाकाटले आटु घेत। वाचा पांगुळली जेथीची तेथ। आपाद कंचुकीत रोमांच आले॥ज्ञानेश्वरी॥९-५२७॥ अष्टसात्विक भाव-“स्तंभ: स्वेदोऽथ रोमांच: स्वरभंगोऽथ वेपथु:। वैवर्ण्यमश्रुप्रलय: इत्यष्टौ सात्विका मता:॥१॥ साधक जेव्हा ईश्वरभक्तीत तल्लीन होतो तेव्हा त्याच्यात अष्ट सात्विक भाव प्रगट होतात। स्तंभ-अंग जखडणे, स्वेद-सर्वांगाला घाम येणे, अंगावर रोमांच येणे, स्वरभंग-कंठ दाटून येणे, वेपथु-सर्वांगाचा कंप होणे वैवर्ण्य-चेहर्यावरचा रंग बदलणे, अश्रुप्रलय-नेत्रातून आनंदाश्रूंचा पूर येणे, अश्रूधारा वाहणे। भक्ती करतांना हे भाव सहजपणे निर्माण झालेच पाहिजेत, तरच आपण भक्तीत तल्लीन झालो असे म्हणता येईल।
पारियाचा रवा घेतां भूमीवरी । यत्न परोपरी साधन तैसें ॥३॥ भक्तीशिवाय इतर साधने कसे अवघड आहेत हे सांगतांना ज्ञानेश्वर महाराजांनी एक उदाहरण दिले। पारा हा धातू जर जमिनीवर पडला तर त्याचे चंचल, हालणारे असंख्य सूक्ष्म कण होतात, जमिनीवर इतस्तत: पसरतात। ते हाताने उचलून एका ठिकाणी ठेवणे खूप कठीण काम आहे। त्याचप्रमाणे ईश्वर प्राप्तीचे इतर साधने कठीण आहेत।
ज्ञानदेव म्हणे निवृत्ति निर्गुण । दिधलें संपूर्ण माझे हातीं ॥४॥ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझे सद्गुरु निवृत्तिनाथ हे निर्गुण आहेत। निर्गुण म्हणजे गुणरहीत, ३ गुणांच्या पलिकडे गेलेले। त्रिगुणातीत। तीन गुणांच्या पलिकडे गेलेल्या महापुरुषांचे वर्णन भगवद्गीतेत आहे। जो ३ गुणांना जिंकतो तो जन्म-मृत्यु-वृध्दत्व-व्याधी सर्वातून कायमचा मुक्त होतो। ,,विमुक्तोऽमृतमश्नुते। त्याला अमृतत्वाची प्राप्ती होते। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अशा सद्गुरु निवृत्तिनाथांनी संपूर्ण ब्रम्हज्ञान जे आदिगुरु परशिवापासून मिळाले ते जसे च्या तसे मला दिले। [[तारीख-०५-०१-२०२३]
