
सिन्नर (प्रतिनिधी) वसंत गोसावी, सिन्नर प्रतिनिधी: पाटोळे येथील जिल्हा परिषद शाळेत पर्यावरणपूरक रंगपंचमी उत्साहात
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटोळे येथे रंगपंचमीचा सण आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी कोरड्या रंगांनी रंगपंचमी खेळत एकमेकांना रंग लावून सणाचा आनंद लुटला. यावेळी पाण्याचा अपव्यय टाळत पर्यावरणपूरक पद्धतीने रंगपंचमी साजरी करण्याचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमावेळी विद्यार्थ्यांना रंगपंचमीचे सांस्कृतिक महत्त्व सांगण्यात आले तसेच रासायनिक रंगांमुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी नैसर्गिक व कोरड्या रंगांचा वापर करण्याचे महत्त्वही समजावून सांगण्यात आले.
या उपक्रमाचे मार्गदर्शन मुख्याध्यापक वसंत गोसावी यांनी केले. यावेळी शिक्षक सुनिता बर्वे, कैलास पवार, मीना सोनवणे व सुनिता खताळे यांनी विद्यार्थ्यांसमवेत रंगपंचमी साजरी केली.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सण साजरा करताना पर्यावरणाचे जतन करण्याची जाणीव निर्माण झाली असून शाळेत आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
