
सिन्नर ( प्रतिनिधी वसंत गोसावी, सिन्नर): सोनांबे (ता. सिन्नर) येथील शिवारात सिन्नर घोटी रस्त्यावरील आई भवानी डोंगरावर लागलेल्या भीषण आगीत १३ हजारांहून अधिक रोपे जळून खाक, जैवविविधतेचे मोठे नुकसान झाले. सोनांबे शिवारातील आई भवानी डोंगरावर रविवारी (ता. ८) दुपारी सुमारे एकच्या सुमारास अज्ञात व्यक्तीकडून आग लावण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या आगीत डोंगरावरील हजारो वृक्षरोपे जळून खाक झाली असून परिसरातील जैवविविधतेला मोठा फटका बसला आहे.

आग लागल्याची माहिती मिळताच जय भवानी लॉन्सचे संचालक सोपान बोडके यांनी तात्काळ सोनांबे गावातील वृक्षमित्र तसेच सिन्नर शहरातील वनप्रस्थ फाउंडेशनच्या स्वयंसेवकांना कळवले. माहिती मिळताच स्वयंसेवकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.या भीषण आगीत वनप्रस्थ फाउंडेशनच्या माध्यमातून लावण्यात आलेली सुमारे ६००० रोपे तसेच वनविभागामार्फत लावण्यात आलेली ७००० हून अधिक झाडे भस्मसात झाली.

त्यामुळे डोंगरावरील हरित पट्ट्याचे मोठे नुकसान झाले आहे. आगीत केवळ झाडेच नाही तर त्या परिसरात वास्तव्य करणारे अनेक लहान-मोठे कीटक, प्राणी आणि पक्षी देखील जळून मृत्युमुखी पडल्याने जैवविविधतेची मोठी हानी झाली आहे. याशिवाय डोंगरावर झाडांच्या पाणीपुरवठ्यासाठी बसविण्यात आलेली ठिबक सिंचन यंत्रणा आणि पीव्हीसी पाईपलाईन देखील जळून खाक झाली. त्यामुळे पुढील काळात झाडांना पाणीपुरवठा करणे हे मोठे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान आग आटोक्यात आल्यानंतर वृक्षमित्र व स्वयंसेवकांनी एकत्र येत नुकसानीची पाहणी केली आणि भविष्यात अधिक जोमाने वृक्षसंवर्धनाचे काम सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. या बचाव कार्यात सोपान बोडके, पोलिस पाटील चंद्रभान पवार, राजेंद्र क्षत्रिय, अभिजीत देशमुख, अनिल जाधव, समाधान बोडके, संदीप खिंवसरा, दत्तात्रय बोराडे, विनोद रोकडे, किरण खिंवसरा, मनोज भंडारी, चंद्रभान वारुंगसे, राणू घोडे, धीरज बोडके, राहुल पवार, जगदीश बोडके, कुणाल बोडके, अभिषेक पवार यांच्यासह अनेक स्वयंसेवक सहभागी झाले होते.

सिन्नर नगरपरिषद तसेच माळेगाव औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन दलाच्या गाड्या व कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या मदतीने आग विझवण्यासाठी मोलाचे योगदान दिले. वनप्रस्थ फाउंडेशन व स्थानिक स्वयंसेवक गेल्या नऊ वर्षांपासून आई भवानी डोंगरावर वृक्षारोपण व संवर्धनाचे कार्य सातत्याने करत आहेत. या उपक्रमातून डोंगरावर सुमारे ११ हजार वृक्ष लावण्यात आले होते आणि त्यापैकी जवळपास ९५ टक्के झाडे जिवंत ठेवण्यात स्वयंसेवकांना यश मिळाले होते. मात्र रविवारी दुपारच्या कडाक्याच्या उन्हात आणि जोरदार वाऱ्यामुळे आग वेगाने पसरत गेली आणि हजारो झाडे भस्मसात झाली. या घटनेमुळे पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून डोंगरावर आग लावणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक व स्वयंसेवकांकडून करण्यात येत आहे.
