नाशिक:( प्रतिनिधी )चॅरिटेबल ट्रस्ट आणि गंगा लॉज मित्र मंडळाच्या वतीने दिले जाणारे यशवंतराव चव्हाण साहित्य आणि कला पुरस्कार जाहीर करण्यात आले
असून नांदगाव येथील सुप्रसिद्ध कवयित्री प्रतिभा पवार-खैरनार यांच्या 'वंशावळीच्या प्राचीन सरीतून' या आशयसंपन्न काव्यसंग्रहाला यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे प्रमुख संयोजक ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे, विजय ढेरे, संजय ढेरे, सचिन जाधव यांनी कळविले आहे येत्या गुरुवारी (१२) पुणे येथील टिळक स्मारक मंदिरात रात्री ८.३० वाजता होणाऱ्या भव्य कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याध्यक्ष सुनील तटकरे, पुणे शहराध्यक्ष सुनील टिंगरे, ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री सतीश आळेकर या मान्यवरांच्या उपस्थितीत कवयित्री प्रतिभा पवार-खैरनार यांना रोख रक्कम रुपये अकरा हजार आणि सन्मानचिन्ह स्वरूपात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. कवयित्री खैरनार यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे, प्रसाद गावडे, प्रेषित प्रदीप सिद्धभट्टी, अविनाश पोईनकर यांनाही विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहेत. यापूर्वीही या काव्यसंग्रहाला राज्यभरातील विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. कवयित्री प्रतिभा पवार-खैरनार यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.