
लोहोणेर-( प्रतिनिधी): येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहपूर्ण वातावरणात मुख्याध्यापिका कल्पना शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षिका उर्मिला चव्हाण होत्या तर उपमुख्याध्यापक निंबा ठाकरे,पर्यवेक्षक विलास निकम आदींसह महिला शिक्षिका व्यासपीठावर उपस्थित होत्या. महिला दिनानिमित्त उपस्थित सर्व महिलांचा गुलाबपुष्प व पेन देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी विद्यालयातील विद्यार्थिनींनी महान व कर्तृत्ववान महिलांच्या भूमिका साकारत एकपात्री नाट्यछटांचे प्रभावी सादरीकरण केले. त्यामध्ये वैष्णवी आहिरे हिने राजमाता जिजाऊ, तेजल सूर्यवंशी हिने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, वैष्णवी भामरे हिने राणी लक्ष्मीबाई, सिद्धी गांगुर्डे हिने सिंधुताई सपकाळ तर दिव्या शिरसाठ हिने डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या भूमिका साकारत त्यांच्या कार्याची माहिती प्रभावीपणे मांडली. या सादरीकरणाला सांस्कृतिक समिती प्रमुख सुनिल एखंडे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यानंतर पर्यवेक्षक विलास निकम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या शेवटी उर्मिला चव्हाण यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत ८ मार्च रोजीच जागतिक महिला दिन का साजरा केला जातो याविषयी माहिती दिली. इतिहासात आपल्या कार्यकर्तृत्वाने ठसा उमटवणाऱ्या महिलांचे उदाहरण देत त्यांनी विद्यार्थिनींना त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन जीवनात स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन विद्यार्थिनी वैदही एखंडे आणि देवयानी खैरनार यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक समितीच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
