

लेखक:- डॉ.गोरखनाथ सुकदेव देवरे
रिटायर्ड मेडिकल ॴॅफिसर ,स्वामी विवेकानंद नगर,येवला रोड, नांदगाव जि.नाशिक
॥आत्मा मालिक। गुरु ओम् गुरु ओम्॥ हरिपाठ चिंतन अभंग क्र-१० “त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी। चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ॥१॥ नामासी विन्मुख तो नर पापिया। हरीविण धावया न पावे कोणी॥२॥ पुराणप्रसिध्द बोलिले वाल्मिक। नामे तिन्ही लोक उध्दरती॥३॥ ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे। परंपरा त्याचे कुळ शुध्द॥४॥
तीर्थीं व्रतीं भाव धरी रे करुणा शांती दया पाहुणा हरि करी. असा सुद्धा एक अभंग आहे. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी. असा संत तुकाराम महाराज यांचा अभंग आहे. तीर्थात फक्त पाणी आणि दगड असते, परंतु संत हे प्रत्यक्ष तीर्थ आहेत. तीर्थी कुर्वन्ती तीर्थानी. संत तीर्थांना तीर्थाचे
स्वरूप देतात, संतामुळे तीर्थ तयार होतात. तीर्थ म्हणजे पवित्र जल. त्यामुळे मन पवित्र होते संतांच्या संगतीमुळे संतांच्या सान्निध्यात पुण्य प्राप्त होते. मन पवित्र होते संत पावन करणारे आहेत. तिर्था बद्दल प्रेम असले पाहिजे परंतु तेवढ्यावरच न थांबता यापुढेही प्रगती केली पाहिजे. परमेश्वराची भक्ति केली पाहिजे. तीर्थात भ्रमण केले तरी नामस्मरणाची आवड नसली तर ते व्यर्थ आहे. जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात, “कुरुते गंगासागरगमनं व्रतपरिपालन मथवा दानं ज्ञानविहीन सर्वमनेंन मुक्तिर्न भवति जन्मशतेन” संत तुकाराम महाराज म्हणतात, “जाऊनिया तीर्था काय तुवां केलें चर्म प्रक्षाळिलें वरी वरी.” तीर्थाला जाऊन तू काय केले फक्त वर वर चे शरीराचे चामडे, कातडे, (त्वचा) धुतले। आत तसाच अपवित्र आहे, मन अशुध्द व अनेक वासनांनी लिप्त झालेले, मलिन असे आहे। असे असेल तर कितीही मोठ्या प्रयागादी तिर्थात स्नान केले तरी काही उपयोग नाही। स्वामी दयानंद सरस्वती म्हणतात, गंगेत स्नान केल्याने स्वर्ग मिळाला असता तर गंगेत रहाणारे बेडूक केव्हाच स्वर्गात गेले असते। पण तसे होत नाही।
तीर्थराज प्रयाग अनेक तीर्थ यात्रा केल्यावर मनाला परमेश्वराची आवड लागली पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजानी नामस्मरणाचे महत्त्व सांगितले आहे. नाम देव आहे. नाम आणि नामी एकच आहेत. नाम हे देवाचे स्वरूप आहे. अनेक जन्मांची पुण्याई असली तर जिभेवर नामस्मरण येते.
जो हरि नामाविषयी विन्मुख आहे म्हणजे ते नाम कधीही घेत नाही, तो मनुष्य पापी होय. त्याला पापातून सोडविणे साठी हरिवाचून दुसरा कोण धाव घेणारा आहे? भगवंताच्या नामाने तिन्ही लोकांचाचा उध्दार होतो असे वाल्मिकी ऋषी नी सांगीतले आहे। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जो हरिनामाचा जप करतो त्याच्या सर्व कुळांचा उध्दार होतो।
फक्त तीर्थात स्नान केल्याने काही प्राप्त होत नाही, त्यासाठी नामस्मरण केले पाहिजे. कितीही वेळा गंगासागर इत्यादि तिर्थांना गेले, कितीही व्रतांचे पालन केले, दानधर्म केले पण जोपर्यंत आत्मज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत शेकडो जन्म जरि गेले तरी मुक्ती नाही। तीर्थयात्रे पेक्षा, तीर्थस्नाना पेक्षा, आत्मज्ञान, नामस्मरण, ईश्वरभक्ती, श्रीगुरुंनी सांगीतलेली साधना एकनिष्ठतेने करणे, संत संग करणे हे श्रेष्ठ आहे। संत हे चालते बोलते तीर्थ आहेत। तीर्थांना तीर्थपण संतांमुळेच येते असे नारद भक्तिसूत्रात आहे। संतांच्या स्पर्शाने संगतीने तिर्थांना तीर्थ रुप प्राप्त होते। संत एकनाथ महाराज जेव्हा भगवत् कथा करीत असत, तेव्हा रात्री च्या वेळी ३ सुंदर तेजस्वी स्रिया त्यांचे भगवत् कथा निरुपण ऐकण्यासाठी येत असत। एकनाथ महाराजांचा मुलगा हरिपंडीत याच्या मनात संशय आला कि या ३ सुंदर स्रिया कोण आहेत? आपले वडील कथा संपल्यावर त्यांना पोहोचवायला जातात, तो म्हणला आज मी त्यांना पोहोचवायला जातो। एकनाथ महाराज म्हणाले ठीक आहे। हरिपंडीत त्यांना पोहोचवायला गेला, त्याने पाहिले काही अंतर गेल्यावर त्या अदृश्य झाल्या। एकनाथ महाराज म्हणाले या तीन स्रिया कोणी सामान्य स्रिया नाहीत। या साक्षात गंगा, यमुना, सरस्वती नद्या आहेत, त्यांच्या पाण्यात स्नान करुन लोक त्यात स्नान करुन आपली पापे धुवून टाकतात, त्यामुळे त्या अपवित्र होतात, ती मलिनता नष्ट करण्यासाठी त्या भगवत् कथा ऐकायला येथे येतात, व श्रवण करुन पुन्हा पूर्ववत् शुध्द होतात। यावरुन ईश्वरभक्ती ही तीर्थयात्रेपेक्षा श्रेष्ठ आहे याचे हे प्रत्यक्ष उदाहरण। तुकाराम महाराज यांचा एक अभंग आहे, “माय बाप केवळ काशी। तेणे न जावे तीर्थासी॥” जो आईवडिलांची सेवा करतो, त्याला काशीला काशी सारख्या कोणत्याही तीर्थाला जाण्याची गरज नाही। तसेच जो अनन्य ईश्वरभक्ती, गुरुभक्ती करतो त्याला कोणत्याही तीर्थाला, कोठेही जाण्याची गरज नाही। सर्व तीर्थ, सर्व देव गुरूत आहेत। “सर्वदेवमयो गुरु:।”-भागवत। बालपणी संपूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा करणारा कार्तिक स्वामी व फक्त शिव-शक्ती रुप आईवडिलांना प्रदक्षिणा करणारा गणपती यांचे उदाहरण सर्वांना ज्ञात आहेच। थोडक्यात अनन्य ईश्वरभक्ताला, किंवा अनन्य गुरुभक्ताला कोणत्याही तीर्थयात्रेला जाण्याची गरज नाही। त्याला सर्व आहे त्या ठिकाणीच, आपल्यातच प्राप्त होते। जो खरा गुरुभक्त आहे, त्याला कोणत्याही तीर्थाला जाण्याची गरज नाही। गुरुकृपेने योग्य वेळी त्याला ध्यानात सर्व तीर्थांचे प्रत्यक्ष दर्शन होते। सर्व तीर्थे स्वत:हून त्याच्याकडे त्याला दर्शन देण्यासाठी येतात। एकनिष्ठ गुरूपदिष्ट साधनेचे असे महत्व आहे।॥एको देव एकधर्म एकनिष्ठा परं तप:। गुरो: परतरं नान्यन्नास्ति तत्त्वं गुरो: परम्॥गुरुगीता-१६८॥ गुरुगीतेत भगवान शिव माता पार्वतीला सांगतात, एकदा आपला ईश्वरा विषयी, सद्गुरुविषयी निश्चय पक्का झाला की लक्ष्य त्या एकाच ठिकाणी ठेवायचे। एकच देव, एकच धर्म, एकाच ठिकाणी निष्ठा, हेच परम तप, श्रेष्ठ तप आहे। गुरु शिवाय, गुरु शक्तिशिवाय दुसरे कोणतेही तत्व श्रेष्ठ नाही। गुरु म्हणजे सर्वत्र व्याप्त ईश्वराची अनुग्राहिका शक्ति। “गुरुर्वा पारमेश्वरी अनुग्राहिका शक्ति:।” शिवसूत्र विमर्शिनी॥
