
लेखक:- डॉ.गोरखनाथ सुकदेव देवरे
रिटायर्ड मेडिकल ॴॅफिसर ,स्वामी विवेकानंद नगर,येवला रोड, नांदगाव जि.नाशिक

॥आत्मा मालिक॥गुरु ओम् गुरु ओम्॥ हरिपाठ चिंतन अभंग क्र-९- “विष्णुविणे जप व्यर्थ त्याचे ज्ञान। रामकृष्णी मन नाही ज्याचे॥१॥ उपजोनी करंटा नेणे अद्वय वाटा। रामकृष्णी पैठा कैसा होय॥२॥ द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान। त्या कैचे कीर्तन घडे नामी॥३॥ ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान। नामपाठ मौन प्रपंचाचे॥४॥
शास्रात “विष्णु” शब्दाची व्याख्या आहे, “विष्-वेवेष्टि-सर्वं जगत् स विष्णु:।” जो सर्व विश्वात व्यापून राहिला आहे तो विष्णु। अशा या सर्वव्यापी (विष्णु) ईश्वराशिवाय जो कोणी दुसरा जप करीत असेल त्याचे ज्ञान व्यर्थ होय। भगवद्गीतेत १ श्लोक आहे, “यान्ति देवव्रता: देवान् पितॄन् यान्ति पितृव्रता:। भूतानि यान्ति भूतेज्या, यान्ति मद्याजिनोऽपि मां॥ अ-९-२५॥” जे देवांची उपासना करतात त्यांना देवलोक प्राप्त होतो, जे पितरांची उपासना करतात, त्यांना पितृलोक प्राप्त होतो। जे भूतांची उपासना करतात, (जादूटोणा करणरे) त्यांना शेवटी भूतलोक प्राप्त होतो। आणि जे माझी[म्हणजे निर्गुण निराकार सर्वव्यापी हृदयस्थ ईश्वराची, आत्म्याची, विष्णू ची उपासना करतात त्यांना मी प्राप्त होतो। असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करतात।
यथा तरो: मूल निषेचनेन, तृप्यंति तत्स्कंधभुजोपशाखा, प्राणोऽपहाराच्च यथेंद्रियाणम्, तथा सर्वाहरणमच्युतेज्या॥भागवत-४-३१-१४॥ ज्याप्रमाणे झाडाच्या मूळाला पाणी दिले तर झाडाच्या सर्व भागांना पाने, फुले, फळे, फांद्या या सर्वांना ते पोहोचते, तसे फक्त एकाच मूळ ईश्वराची [ओम्-विष्णु-आत्मा] उपासना केली तर ती सर्व देव-देवतांना पोहोचते। त्या इतर देव-देवतांची उपासना करण्याची गरज नाही। नाथ भागवत॥
उपजोनी करंटा नेणे अद्वय वाटा। रामकृष्णी पैठा कैसा होय॥२॥ जो अद्वैत मार्ग जाणत नाही, तो जन्माला येऊनही करंटाच आहे, दैवहीनच आहे। द्वैत-अद्वैत हा विषय अत्यंत गहन आहे। त्याचे सविस्तर विवेचन करणे येथे शक्य नाही। थोडक्यात इतकेच ध्यानात ठेवावे कि, अनेक प्रकारचा भेद म्हणजे द्वैत भाव [जीव-शिव, जीव-ईश्वर इत्यादि] नष्ट करणे व सर्वत्र अद्वैताची प्रतिती येणे हे आपले ध्येय आहे। जोपर्यंत द्वैत आहे, तोपर्यंत भय, दु:ख, बंधने, जन्ममृत्यु चे चक्र आहे। “मृत्यो: स मृत्युमाप्नोति य इह नानेव पश्यति॥” जो भेद पहातो, अनेकता पहातो, तो पुन्हा पुन्हा मृत्यु ला प्राप्त होतो। “द्वितीयाद् वै भयं भवति।” ज्यावेळी जीव च ईश्वर, जीवच ब्रम्ह होतो, तेव्हा काहीच करावे लागत नाही। सर्वत्र आनंदच आहे। ईश्वराशिवाय, आनंदाखेरीज काहीच नाही। जोपर्यंत अद्वैत भाव येत नाही, तोपर्यंत हा जीव रामकृष्ण स्वरुपाशी समरस होणार नाही। “म्हणैनि माझिया भजना। उचित तोचि अर्जुना। गगन जैसे आलिंगना। गगनाचिया॥ज्ञा-१५-५६४॥ साडे पंधरा मिसळावे। तैं साडे पंधरेचि होआवे। लेवी मी झालिया संभवे। भक्ती माझी॥ज्ञा-१५-५६५॥” जसे आकाशाने आकाशाला आलिंगन द्यावे, तसे देव होऊन देवाची भक्ती करावी। देव होऊन देवाची भक्ती करतो तोच माझी भक्ती योग्य प्रकारे करतो। भक्तीसाठी तोच योग्य आहे।
द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान। त्या कैचे कीर्तन घडे नामी॥३॥ द्वैताची झाडणी, द्वैत भाव नष्ट करणे ही साधी गोष्ट नाही, कारण ते जन्मोजन्मीचे संस्कार आहेत। ते नष्ट करण्यासाठी सद्गुरु आवश्यक आहे। गुरुकृपेशिवाय अद्वैताचे ज्ञान, अनुभूति होत नाही। त्यामुळे जीवनात, अध्यात्मात प्रत्यक्ष अनुभूति साठी सद्गुरु पाहिजेच। “गुरुं विना ब्रम्ह नान्यत् सत्यं सत्यं वरानने। गुरुगीता।” गुरु शिवाय ब्रम्हानुभूति नाही। गुरुविणा ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय द्वैताची झाडणी नाही, व त्याशिवाय नामसंकीर्तन कसे घडेल? आवड असल्याशिवाय व काहीतरी अनुभव आल्याशिवाय मन ईश्वराभिमुख होत नाही, व इश्वर भक्तीची जी नाम संकीर्तनादि साधने आहेत त्या कडे प्रवृत्ती होत नाही। संत कृपा, गुरुकृपा झाली की काम कसे सहज होते, कळत ही नाही।” संत चरणरज लागता सहज, वासनेचे बीज जळोनी जाय॥१॥ मग रामनामी उपजे आवडी। सुख घडोघडी वाढू लागे॥२॥” संत चरण धूळ इतकी जरी कृपा झाली कि वासनेचे बीज जळू लागते, व रामानामाविषयी सहज आवड उत्पन्न होते व हळू हळू सुख {आत्मसुख] वाढत जाते। संतकृपेचा असा महिमा आहे।
ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान। नामपाठ मौन प्रपंचाचे॥४॥
साधक ध्याना कडे वळू लागतो। संतकृपा, द्वैतनाश, यामुळे मनाला ध्यानाची आवड उत्पन्न होते। साधक सहज पणे ध्यान करु लागतो। “तुका म्हणे संतत ध्याता। परब्रम्ह आले हाता॥१॥” “तटस्थ ते ध्यान विटेवरी॥” इश्वराच्या सगुण किंवा निर्गुण रुपाचे ध्यान आपण करु शकतो। फलश्रुति एकच आहे। एकदा ईश्वराकडे पूर्ण ध्यान लागले की “नामपाठ मौन प्रपंचाचे।” प्रपंचातील आसक्ती नष्ट होऊ लागते, चिंता मिटतात, साधक नित्यानंदाचा अनुभव करतो। नामसंकीर्तन आणि ध्यान यामुळे मनुष्य प्रपंच्याच्याच काय पण सर्वच बंधनातून कायमचा मुक्त होतो। “ज्ञात्वा देवं सर्वपाशापहानि:।” असे उपनिषद् वचन आहे। जीवन सुखी होते। [02-01-2023]
