
जळगाव निंबायती (वार्ताहर) – अमोल अहिरे – बांधकाम मजूर (बिगारी) म्हणून कुटुंबाचा कसाबसा गाडा हाकणाऱ्या येथील धोंडीराम शिंदे यांचा मुलगा मयूर शिंदे याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिद्द, चिकाटी कठोर परिश्रम आणि प्रबल इच्छाशक्तीच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्थापत्य अभियांत्रिकी परीक्षेत इतर मागास प्रवर्गातून राज्यात तिसरा क्रमांक पटकावत पहिल्याच प्रयत्नात उल्लेखनीय यश संपादन केले.
मयूरने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागात उपकार्यकारी अभियंता वर्ग १ या अधिकार पदाला गवसणी घालत आई वडीलांच्या कष्टाच्या घामाचं चिज केलं आहे. मयूरची जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात ग्रामीण पाणीपुरवठा विभागात उपकार्यकारी अभियंता म्हणून नियुक्ती झाली आहे.
मयूर घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्याचे प्राथमिक शिक्षण मामांकडे राहून सोयगाव, मालेगाव येथील विनय मंदिर या शाळेत झाले तर १२ वी पर्यंतचे शिक्षण के. बी. एच विद्यालयात झाले. चुलत भाऊ किरण दगडू शिंदेचा सिव्हिल डिप्लोमा होऊन तो कुटुंबात पहिला उच्च शिक्षित झाला होता, त्याच्या प्रेरणेने मयूरने नाशिक येथील मविप्र संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून सिव्हिल इंजिनिअरिंगची (बी. ई.ची) पदवी संपादन केली. दिवंगत मोठे काका कै. दगडू शिंदे यांचे स्वप्न होते की शिंदे कुटुंबातून एखादा तरी अधिकारी व्हावा, या प्रेरणने मयूरने पुणे येथे दुसरे मामा यांच्या घरी राहून स्पर्धा परीक्षेची वाट धरली. त्याच्या दोन्ही मामांनी त्याला सर्वतोपरी सहकार्य केले. दोन वर्षांच्या अथक परिश्रमानंतर दररोज दहा ते बारा तास नियमित अभ्यास करुन मयूरने पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले आहे. एवढ्यावरच न थांबता भविष्यात केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न मयूरने यावेळी बोलताना सांगितले.
मयूरचे गावी जल्लोषात स्वागत झाले. मुलगा अधिकारी झाल्याने आई, वडील व आजीने मयूरला मायेने मिठीत धरत आनंदाश्रूंची वाट मोकळी केली, यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले, तर तरुणांसाठी हा प्रेरणादायी प्रसंग ठरला. मयूरचे श्रीमती कासूताई पाटील, महेंद्र पाटील, निंबाजी शिंदे, किरण शिंदे, लखन सूर्यवंशी, राकेश शिंदे, देवकाबाई शिंदे, पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक, विविध संस्थांचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व तरुण युवकांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.
अधिकारी झाल्यावरच गावी परतण्याचा संकल्प केला होता. दोन वर्षांची कठोर मेहनत व प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळाल्याचे मनोमन समाधान आहे. मात्र मागे वळून पाहिल्यास अंगावर काटा उभा राहतो. माझ्या यशात आई, वडील, कुटुंबातील सर्व सदस्य, नातेवाईक विशेषतः मामा, गुरुजन व मित्र परिवाराची प्रेरणा, प्रोत्साहन व पाठिंब्याची, मोठी भूमिका आहे.
मयूर शिंदे, उपकार्यकारी अभियंता
