
सिन्नर ( वसंत गोसावी, सिन्नर प्रतिनिधी): पाटोळे ता. सिन्नर येथील जिल्हा परिषद शाळेचा इयत्ता पाचवीचा विद्यार्थी चि. वेद शंकर खैरनार याने सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षेत घवघवीत यश संपादन करत शाळेचा आणि गावाचा अभिमान उंचावला आहे. वेदच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला.
सत्कार समारंभात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुदाम पानसरे तसेच सेवानिवृत्त पोलीस अधिकारी भिमराव साळवे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते वेदचा गौरव करण्यात आला.
वेदची उज्ज्वल कामगिरी
वेदने सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षेत खालीलप्रमाणे भरीव यश मिळवले –
गणित – १३८ / १५०
माहिती तंत्रज्ञान – ३६ / ५०
मराठी – ४६ / ५०
सामान्य ज्ञान – ३८ / ५०
एकूण गुण – २५८ / ३००
या उत्कृष्ट यशामुळे वेदने आपल्या जिद्दी, परिश्रम आणि बुद्धिमत्तेचा ठसा उमटवला आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वी २०२४ मध्ये याच शाळेतील विद्यार्थी आदित्य उत्तम खताळे हाही सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षेस पात्र ठरला होता आणि तो सध्या चंद्रपूर येथे शिक्षण घेत आहे. त्यामुळे पाटोळे शाळेची ही यशस्वी परंपरा अधिक भक्कम होत आहे.
वेदला आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट टीम तसेच शाळेचे मुख्याध्यापक वसंत गोसावी, वर्गशिक्षक कैलास पवार, सुनिता बर्वे, मिना सोनवणे, स्वाती खताळे, प्रतिभा पवार, सुनिता खताळे आदी शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी राजेश डामसे, शालेय पोषण आहार योजना अधिक्षक रूपाली पगार, शिक्षण विस्तार अधिकारी कैलास सांगळे, केंद्रप्रमुख विजय निरगुडे यांनीही वेदचे अभिनंदन करून त्याच्या उज्ज्वल भवितव्यास शुभेच्छा दिल्या.
प्रेरणेचा दीपस्तंभ
सत्कार प्रसंगी सुदाम पानसरे म्हणाले,
“वेदच्या यशाची प्रेरणा घेऊन इतर विद्यार्थ्यांनीही अभ्यासात प्रगती साधावी. वेदने मिळवलेल्या यशामुळे शाळेचे व गावाचे नाव उज्ज्वल झाले आहे. अशीच यशस्वी परंपरा पुढेही कायम राहो.”
सेवानिवृत्त पोलीस अधिकारी भिमराव साळवे यांनीही शाळेच्या यशाचा ग्रामस्थांना अभिमान असल्याचे सांगितले.
वेद खैरनारचे हे यश केवळ गुणांपुरते मर्यादित नसून ते गावातील प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही मोठी स्वप्ने पाहून अथक परिश्रम केल्यास यश नक्की मिळते, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे वेद!
पाटोळे शाळेचा हा यशकिरण भविष्यात देशसेवेच्या उंच शिखरावर झळकावा, हीच सर्वांची अपेक्षा!
