
लेखक:- डॉ.गोरखनाथ सुकदेव देवरे
रिटायर्ड मेडिकल ॴॅफिसर ,स्वामी विवेकानंद नगर,येवला रोड, नांदगाव जि.नाशिक

॥आत्मा मालिक। गुरु ओम् गुरु ओम्॥ हरिपाठ चिंतन अभंग क्रमांक-५ -“योग याग विधी येणे नोहे सिध्दी। वायाचि उपाधी दंभ धर्म॥१॥ भावेविण देव न कळे नि:संदेह। गुरुविण अनुभव कैसा कळे॥२॥ तपेविण दैवत दिधल्याविण प्राप्त। गुजेविण हित कोण सांगे॥३॥ ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात। साधूची संगती तरणोपाय॥४॥ योगयाग विधी येणे नोहे सिध्दी। वायाचि उपाधी दंभ धर्म॥ स्वत: ज्ञानेश्वर महाराज योगी होते, त्यांना योग्यांचा राजा म्हटले आहे, तरी, योग शास्र एवढे श्रेष्ठ आहे, तरी या अभंगात असे का म्हटले आहे? योगयागाने (ईश्वर) सिध्दी प्राप्त होत नाही? कारण, योगाचे अनेक प्रकार आहेत, हठयोग, लय, राज योग, इत्यादि। येथे सिध्दयोगा बद्दल सांगीतले नाही। सिध्दयोग गुरुकृपेने होणारा सर्वश्रेष्ठ सहज योग आहे। या अभंगात स्वत:च्या प्रयत्नाने जेव्हा साधक हठयोगादि करतो, तेव्हा त्याला अनेक संकटे येतात, खूप कष्ट पडतात। कठीण नियमांचे पालन करावे लागते, तरी सुध्दा गुरु शिवाय हठयोग करणे धोकेदायक असते, अर्धवट कुंडलिनी जागृत झाल्यास दुष्परिणाम ही होतात। तसेच महत् प्रयासांनी साध्य केला तरी अनेक सिध्दींच्या मोहात साधक अडकतो व त्याचे पुन: अध:पतन होते। त्यामुळे अशा योगाची येथे निंदा केली आहे। ईश्वर प्राप्ती न होता साधक मोहात पडतो, त्याला सिध्दींचा अहंकार, होतो। दंभ-ढोंग, मीपण उत्पन्न होतो। ईश्वर प्राप्ती न होता तो इतरत्र भरटकतो, त्यामुळे या पेक्षा भक्तीमार्ग सोपा आहे, त्यात काही कष्ट नाही, दुष्परिणाम नाही व भक्तीने ईश्वरप्राप्ती सहज होते। तसेच याग म्हणजे यज्ञ, अनेक यज्ञ यजुर्वेदात आहेत। त्यांनी मनाच्या भौतिक व स्वर्गसुखाच्या सर्व ईछा पूर्ण होतात, पण ईश्वर प्राप्ती होत नाही। यज्ञाबद्दल दोन्ही प्रकारचे मतांचे भगवद्गीतेत विवेचन आहे। यज्ञ करणे चांगले असेही मत आहे, व यज्ञाने देव भेटत नाही असेही मत आहे। “यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रर्थयन्ते”। यज्ञाने स्वर्ग मिळतो।गीता। दोन्ही मतांचा सारासार विचार करण्यासाठी भगवद्गीतेचा अभ्यास केला पाहिजे। त्याचे सविस्तर विवेचन येथे करणे शक्य नाही। “यज्ञदानतप:कर्म न त्याज्यं कार्यमेव तत्। यज्ञो दानं तपश्चैच पावनानि मनीषिणाम्॥१८-५॥गीता॥ यज्ञ, दान तप ही कर्मे केली पाहिजे। “नाहं वेदैर्न तपसा न दानेन न चेज्यया। ११-५३॥ वेद, दान तप व यज्ञ यांनी ईश्वराच्या विश्वरुपाचे दर्शन होऊ शकत नाही। एकनाथी भागवतात सुध्दा योगा पेक्षा भक्तीमार्ग श्रेष्ठ आहे असे प्रमाण आहे, भगवान श्रीकृष्ण उध्दवाला सांगतात
“न साधयति माम् योगो न सांख्यं धर्म ऊध्दव। न स्वाध्यायस्तपस्त्यागो यथा भक्तिर्ममोर्जिता॥११-१४-२०॥ “नाथ भागवत. “मी योग, सांख्य शास्रज्ञान, तप, त्याग इत्यादिंनी इतका साध्य होत नाही, जितका भक्तीने होतो।
भगवान विष्णु नारदाला सांगतत,” नाहं वसामि वैकुंठे, योगिनां हृदये रवौ। मद्भक्ता: यत्र गायन्ति, तत्र तिष्ठामि नारद॥१॥” मी वैकुंठात राहात नाही, योग्यांच्या हृदयात ही राहात नाही, सूर्यबिंबात ही राहात नाही, परंतु जेथे माझे भक्त प्रेमाने माझे नाम-संकीर्तन करतात, तेथेच मी राहातो, प्रकट होतो।
परि तयापासी पांडवा। मी हारपला गिवसावा। जेथ नामघोषु बरवा करिती माझा॥९-२०८॥ ॥ज्ञानेश्वरी॥ अर्जुना, मी जर हरवलो तर मला कोठे शोधायचे? तर ज्या ठिकाणी माझे भक्त नामसंकीर्तन करतात, माझी भक्ती करतात। तेथे मला शोधावे, मी तेथेच सापडतो।
भावेविण देव न कळे नि:संदेह। गुरुविण अनुभव कैसा कळे॥२॥ श्रध्दा, दृढ भाव, या शिवाय देव कळत नाही। सद्गुरूंच्या कृपेशिवाय ईश्वराचा प्रत्यक्ष अनुभव कसा येईल? सद्गुरु म्हणजे काय? त्यांचे स्वरुप, कार्य, दीक्षा, कृपा या बद्दल चे विवेचन मागील अनेक चिंतनात आपण ऐकले आहे, त्यामुळे त्यापेक्षा विशेष सांगण्याची गरज नाही। यापूर्वी ग्रुपवरील अनेक चिंतनात याविषयी सविस्तर विवेचन केलेले आहे। तपश्चर्या केल्याशिवाय दैवताची प्राप्ती कशी होणार? तप म्हणजे काय? याचे विवेचन भगवद्गीता १८ वा अध्यायात सविस्तर केले आहे, व इतर अनेक शास्रात केले आहे। महाभारतात “मनसश्चेंद्रियाणां एकाग्र्यं परमं तप:। ” मन व इंद्रिये यांची एकाग्रता म्हणजे तप असे म्हटले आहे। “तप:स्वाध्याय ईश्वरप्रणिधानानि क्रियायोग:।पतंजल योगसूत्र॥” ईश्वर प्राप्तीसाठी केलेले शारीरिक व मानसिक कष्ट म्हणजे तप। जगद्गुरु शंकराचार्यांच्या “आत्मबोध” ग्रंथात म्हटले आहे कि तप केल्याने पापे नष्ट होतात, विचार केला तर हे खरे आहे, कारण तप करतांना साधक अनेक शारीरिक मानसिक कष्ट स्वत:हून भोगून घेतो त्यामुळे पाप नष्ट होते। कष्ट भोगणे याचा अर्थ एका प्रकारे पूर्व पापच भोगून घेणे। “तपोभि: क्षीण पापानां, शान्तानां वीतरागिणां। मुमुक्षुणामपेक्षोऽयं आत्मबोधो विधीयते।-आत्मबोध॥ तपोभि: क्षीण पापानां- तपश्चर्येने ज्यांचे पाप नष्ट झाले आहे, जो शांत, वीतरागी, वैराग्य युक्त आहे अशा मुमुक्षु साधकां साठी हा आत्मबोध नावाचा ग्रंथ आहे। दिल्याशिवाय, काही केल्याशिवाय काही प्राप्त होत नाही। गूज म्हणजे हिताची गोष्ट, ज्याचेवर आपले प्रेम असते त्यालाच आपण त्याच्या हिताची गूज गोष्ट सांगतो सद्गुरु, शिष्याला, संत सर्वांना गूज-हिताची कल्याणाची गोष्ट सांगतात। ज्ञानेश्वर महाराज स्वत: चा अनुभव सांगतात की साधूंची संगती हाच तरणोपाय आहे। संसार सागरातून तरुन जाण्याचा उपाय आहे।
