
नांदगाव – येथील कवी व गझलकार काशिनाथ गवळी यांना साहित्य क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल शिवसेनेच्या वतीने स्व. शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा गुणवंत साहित्यिक पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याचे मा. नगरसेवक भगूर नगरपालिका व एन. डी. एस. टी. सोसायटीचे संचालक मा. संग्राम करंजकर यांनी जाहीर केले आहे. पुरस्कारासाठी निवड झाल्याचे पत्र कवी काशिनाथ गवळी यांना नुकतेच प्राप्त झाले आहे.
कवी व गझलकार काशिनाथ गवळी हे कै.पुंडलिक पांडुरंग मवाळ विद्यालय पिंपरखेड ता. नांदगाव जि. नाशिक येथे मुख्याध्यापक या पदावर कार्यरत असून कला, क्रिडा संगीत व साहित्य हे त्यांच्या आवडीचे क्षेत्र आहेत. आतापर्यंत त्यांचे ‘बाप बळीचिया बळे’ व ‘जाणीवगर्भ’ हे दोन काव्यसंग्रह व पाच प्रातिनिधिक काव्यसंग्रह व गझलसंग्रह प्रकाशित आहेत. आतापर्यंत त्यांना शैक्षणिक, सामाजिक व साहित्य क्षेत्रातील अनेक पुरस्कार मिळाले आहेत. अनेक महत्त्वाच्या मासिकातून व वर्तमान पत्रातून त्यांच्या साहित्याला प्रसिद्धी मिळाली आहे.
कवी काशिनाथ गवळी यांनी विविध शाळा,महाविद्यालयांना भेटी देऊन ग्रामीण भागात साहित्य चळवळ रूजविन्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. आतापर्यंत त्यांनी ग्रामीण ते शहरी भागात अनेक कवी संमेलने व गझल मुशायरे यशस्वीरित्या संपन्न केले आहेत. कवी काशिनाथ गवळी यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने, गझल मुशायरे व कवी संमेलनांमध्ये महत्त्वपूर्ण सहभाग नोंदविला आहे. त्यांच्या अनेक रचनांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आहे.
तसेच कवी काशिनाथ गवळी अनेक साहित्यिक संस्थाचे संचालक असून त्यांना व त्यांच्या साहित्याला अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा.नांदगावच्या पदाधिकारी व सदस्यांनी व शिक्षण,साहित्यादी सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. मार्च महिन्यात लवकरच एका समारंभात मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होईल असे आयोजकांनी कळवले आहे.
