

लेखक : डॉ. गोरखनाथ सुकदेव देवरे, रिटायर्ड मेडीकल ऑफिसर.स्वामी विवेकानंद नगर , येवला रोड, नांदगाव, जिल्हा नासिक
॥आत्मा मालिक॥गुरु ओम्। गुरु ओम्॥ हरिपाठ अभंग चिंतन-४– ॥भावेविण भक्ति भक्तिविण मुक्ति। बळेविण शक्ति बोलू नये॥१॥ कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित। उगा राहे निवांत शिणसी वाया॥२॥ सायासे करिसी प्रपंच दिननिशी। हरिसी न भजसी कोण्या गुणे॥३॥ ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे। तुटेल धरणे प्रपंचाचे॥४॥ ईश्वर प्राप्तीचे अनेक मार्ग सांगितले आहेत, प्रत्येकाची प्रकृति वेगवेगळी असते, त्याप्रमाणे प्रकृति स्वभावानुसार प्रत्येकाच्या आवडी निवडी हि वेगवेगळ्या असतात। त्यामुळेच संत व शास्रांनी वेगवेगळे मार्ग सांगितले आहेत। ज्याला जो मार्ग आवडेल त्याने ती साधना करावी। शेवटी सर्व साधनांचे फळ एकच आहे- आत्मसाक्षात्कार। अधिकार तैसा दवियेला मार्ग। असे तुकाराम महाराजांचे एक वचन आहे। आबालवृध्द सर्वांसाठी संतांनी भक्तिमार्ग सांगितला आहे। भक्तिसाठी सर्वात आवश्यक गोष्ट आहे-भाव। मनात ईश्वराबद्दल, संतांबद्दल भाव, प्रेम, श्रध्दा विश्वास नसेल तर भक्ती होऊच शकत नाही। भावाशिवाय भक्ती नाही, व भक्तीशिवाय मुक्ती नाही। आपल्या अंगी बळ म्हणजे कोणतेही काम करण्याची शक्ती-क्षमता नसेल तर विनाकरण त्याबद्दल वल्गना करु नये, त्याबद्दल बोलू नये। “तुका म्हणे भक्तिभाव। तोचि देवाचा ही देव।” भाव म्हणजे निष्काम प्रेम, दृढ विश्वास, श्रध्दा। काही न मागता निष्काम भक्ती सर्वश्रेष्ठ आहे। “भज्-सेवायाम्” या संस्कृत शब्दापासून भक्ती हा शब्द तयार झाला। परतफेडीची अपेक्षा न करता निष्काम भावनेने केलेली सेवा म्हणजे भक्ती। खरा भक्त देवाजवळ काहीच मागत नाही। फक्त देवाचे प्रेम एवढेच। नारदांनी भक्तीची व्याख्या केली, “सा त्वस्मिन् परमप्रेमरुपा। अमृतस्वरुपा च। नारद भक्तिसूत्र्॥” ईश्वरावर अनन्य प्रेम म्हणजे भक्ती, भक्ती अमृतस्वरुप आहे। “काही न मागे कोणासी। तोचि आवडे देवासी॥” “कही न मागे देवा। त्याची करु धावे सेवा।” असे अनेक संत वचने आहेत। भगवद् गीतेत ४ प्रकारचे भक्त सांगीतले आहेत।-“चतुर्विधा भजन्ते मां जना: सुकृतिनोऽर्जुन। आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ॥७-१६॥ भगवद्गीता॥ तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्ति र्विशिष्यते। प्रियो हि ज्ञानिनोऽत्यर्थमहं स च मम प्रिय:॥७-१७॥चार प्रकारचे भक्त-(१) आर्त- जेव्हा जीवनात दु:ख येते, फक्त तेव्हाच दु:ख निवारणासाठी देवाची भक्ति करतो तो “आर्त भक्त”। (२)- जिज्ञासु- काही तरी ज्ञान जाणुन घेण्यासाठी भक्ति करणारा (३)-अर्थार्थी- द्रव्य प्राप्तीसाठी भक्ती करणारा (४)-ज्ञानी भक्त- हा देवा जवळ काहीच मागत नाही। निष्काम प्रेम, निष्काम भक्ती। त्याला प्रत्यक्ष देवच प्राप्त होतो, तो देवच होतो। हे सर्व भक्त चांगले आहेत, त्यांना त्यांच्या श्रध्देप्रमाणे फळ ही मिळते, परंतु, ज्ञानी भक्त, निष्काम भक्त सर्वश्रेष्ठ आहे। तो माझा आत्माच आहे असे भगवान श्रीकृष्ण म्हणतात। जगद्गुरु शंकराचार्यांनी भक्तीची व्याख्या केली- “मोक्षकारण सामग्र्यां भक्तिरेव गरीयसी। स्वस्वरुपानुसंधानं भक्तिरित्यभिधीयते॥ विवेकचूडामणि-२२॥ मोक्षप्राप्ती च्या साधनां मध्ये भक्तीमार्गच सर्वश्रेष्ठ आहे, स्वस्वरुपाचे अनुसंधान म्हणजे भक्ती।
कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित। उगा राहे निवांत शिणसी वाया॥-माणसाला वाटते देवाचे भजन केले कि देव लगेच भेटला पाहिजे। देवाचा काही अनुभव आला नाही कि तो लगेच दुसरे उपाय शोधतो, दुसर्या मार्गांना लागतो। वेगवेगळे देव देवतांची व्रते करतो, सतत मार्ग बदलतो, एका ठिकाणी त्याचे लक्ष नसते अशा भक्ताला ज्ञानेश्वरीत व्यभिचारी भक्त म्हटले आहे। अशा भक्ताला काही प्राप्त होत नाही। नागपंचमीला नागांची उपासना, चतुर्थी ला गणपती, सोमवारी बेल घेऊन शंकराची उपासना, एकादशीला विष्णू, नवरात्री ला देवी ची उपासना। सतत देव बदलतो। ऐसा अखंड भजन करी। उगा नोहे क्षणभरी।,,ऐसेनि जो भक्तु। देखसी सैरा धावतु। जाण अज्ञानाचा मूर्तु।अवतार तो॥ज्ञानेश्वरी-१३-८२३॥ असा एका ठिकाणी मन स्थिर नसणारा व देव बदलणारा भक्त हा साक्षात अज्ञानाचा अवतारच होय। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात-माझी मूर्ती निफजवी। ते घराचे कोनी बैसवी। आपण देवोदेवी यात्रे जाय॥१३-८१५॥ अज्ञानी भक्त माझी मूर्ती आणतो, ती घराच्या एका कोनाड्यात बसवतो, आणि स्वत: देवदेवतांच्या यात्रेला जातो। नित्य आराधन माझे। काजी कुळदैवता भजे। पर्वविशेषे कीजे पूजा आना॥८१६॥ माझे अधिष्ठान घरी। आणि वोवसे आनाचे करी। पितृकार्यावरी पितरांचा होय॥८१७॥ एकादशीच्या दिवशी। जेतुला पाडु आम्हासी। तेतुलाचि नागांसी। पंचमीच्या दिवशी॥८१८॥ चैथ मोटकी पाहे। आणि गणेशाचाचि होये।चावदसी म्हणे माये। तुझाचि वो दुर्गे॥८१९॥ नित्य नैमित्तिके कर्मे सांडी। मग बैसे नवचंडी।आदित्यवारी वाढी बहिरवा पात्री॥८२०॥ पाठी सोमवार पावे।आणि बेलेसी लिंगा धावे।ऐसा एकलाचि आघवे। जोगावी जो॥८२१॥ ऐसा अखंड भजन करी। उगा नोहे क्षणभरी।अवघेन गावद्वारी।अहेव जैसी॥८२२॥ रोज माझी पूजा करणे आवश्यक असतांना ती सोडून कूळदेवतेची पुजा करतो। विशेष पर्वणी आली कि तिसर्याच देवतेची पुजा करतो। माझी स्थापन केलेली असताना दुसर्या देवाला नवस करतो। श्राध्दकाळी पितरांची पुजा करतो। गणेश चतुर्थीला गणेशभक्त होतो। चतुर्दशीला देवीची पूजन करुन “हे अंबे दुर्गे!” मी तुझाच आहे, अशी मनोभावे प्रार्थना करतो। गावाव्या वेशीत बसलेली वेश्या जशी अखंड सौभाग्यवती असते असा हा भक्त असतो अशा शब्दात ज्ञानेश्वर महाराजांनी या अज्ञानी भक्ताचे वर्णन केले आहे।
उगा राहे निवांत शिणसी वाया- ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जरि अनुभव आला नाही तरी निवांत राहा। इतर मार्गांच्या मागे लागल्यास व्यर्थ शीण त्रास च होईल। नियमित साधना करीत राहिल्यास योग्य वेळी साधनेचे फळ मिळतेच असा दृढ निश्चय हवा। सायासे करिसी प्रपंच दिननिशी। हरिसी न भजसी कोण्या गुणे॥-मनुष्य रोज प्रपंच करतो, त्यातच गुरफटतो। भैतिक सुखांसाठी रात्रंदिवस कामे करतो, व म्हणतो कि मला देवाची भक्ती करायला वेळच मिळत नाही। तर भक्ती, साधना कशी करणार? असे काहीतरी बहाणे सांगून मनुष्य फक्त प्रंचातच मग्न राहातो, अध्यात्मिक साधना (जे मनुष्य जन्माचे मुख्य ध्येय आहे ते) करीत नाही। अशा मनुष्याला तुकाराम महाराज म्हणतात, तुला २४ तास काम करायला वेळ मिळतो पण अध्यात्मिक साधनेला मात्र वेळ मिळत नाही। तुकाराम महाराजा काय म्हणतात हे त्यांच्याच शब्दात ऐकू-
“पोटासाठी खटपट करिसी अवघा वीळ। राम राम म्हणता तुझी बसली दातखीळ॥१॥ हरी चे नाम कदा काळी का रे नये वाचे। म्हणता राम राम तुझ्या बा चे काय वेचे॥२॥ द्रव्याविया आशा तुजला दाही दिशा न पुरती। कीर्तनासी जाता तुझी जड झाली मती॥३॥ तुका म्हणे ऐशा जीवा काय करु आता। राम राम न म्हणे त्याचा गाढव मातापिता॥४॥ (१९८३)” पोटापाण्यासाठी काम करायला तुला सर्व वेळ मिळतो, पण राम-राम नामस्म्रण करायला तुझी दातखीळ बसते। तुला वेळ नाही। द्रव्य प्राप्तीसाठी तुला दाही दिशा पुरत नाही, त्यासाठी कुठेही जायला तयार असतो, पण कीर्तन प्रवचन सत्संग येथे जायला तुझी बुध्दी जड होते।
तुकाराम महाराज रागावून शेवटी म्हणतात जो ईश्वर भक्ती करीत नाही अशा माणसाला काय म्हणावे? जो नामस्मरण भक्ती करित नाही त्याचे आई-वडील गाढव आहेत। संत जगाला उपदेश करुन कंटाळतात, शेवटी रागावून बोलतात, पण त्यांच्या रागावण्यात ही जगाचे कल्याण असते। संतांचे रागावणे आईचे मुलावर रागावण्यासारखे असते। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, “माऊलीच्या कोपी। स्नेह आथी।” आईच्या रागावण्यात सुद्धा प्रेम असते।
ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे। तुटेल धरणे प्रपंचाचे॥ ज्या प्रपंचाची चिंता माणसे करतात त्याच्या बंधनातून सुटण्याचा एकच उपाय आहे, हरिनामाचा जप करणे। अध्यात्मिक साधना करणे। मनुष्य कष्टाने प्रपंच करतो पण त्या प्रपंच्याच्या बंधनातून सुटण्याचा प्रयत्न करीत नाही। जर अध्यात्मिक साधना केली तर मनुष्य संसारातील सर्वच बंधनातून कायमचा मुक्त होतो, व खरा सुखी होतो।
ज्ञात्वा देवं सर्वपाशापहानिः, क्षीणैः क्लेशैर्जन्ममृत्युप्रहाणिः। तस्याभिध्यानात् तृतीयं देहभेदे, विश्वैश्वर्यं केवल आप्तकामः॥श्वेताश्वतर उपनिषद -३-११॥
त्या सर्वव्यापी ईश्वराला जो प्रत्येकाच्या अंतर्यामी आहे, त्याला जाणल्याने, मनुष्य सर्व प्रकारचे क्लेश, बंधने व दु:खे यातून कायमचा मुक्त होतो, व दिव्य आत्मसुखाला, ईश्वरीय ऐश्वर्याला प्राप्त करतो॥
