
मुंबई (प्रतिनिधी) – मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त आयोजित मी मराठी लोक चळवळ अभियान मैत्री संस्था व उत्प्रेरक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदान करण्यात येणारा ‘मी मराठी राजभाषा स्वाभिमान गौरव पुरस्कार २०२६’ हा सन्मान सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे पोलीस मित्र व सामाजिक कार्यकर्ते दिलीप भिवाजी नारद यांना प्रदान करण्यात आला.
रविवार दिनांक ०१ मार्च २०२६ रोजी बाळ दंडवते सभागृह येथे भव्य पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.
यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री चिन्मयी सुमित, राजमाता जिजाऊंचे चौदावे वंशज संभाजी राजे जाधव (सिंदखेड राजा), समाजसेविका चारुशीला देशमुख, मा. सदस्य चित्रपट बोर्ड भारत सरकार विलास खानोलकर, महाराष्ट्राचे लाडके शाहीर दत्ता म्हात्रे, लेखक-कवी व मुक्त पत्रकार सुरज भोईर तसेच राजू चौधरी (छत्रपती शिवाजी महाराज मंदिर विश्वस्त, भिवंडी जि. ठाणे) यांच्यासह पत्रकार, कवी, लेखक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
दिलीप भिवाजी नारद यांनी पोलीस मित्र म्हणून समाजात कायदा व सुव्यवस्था राखण्यास दिलेले सहकार्य, तसेच विविध सामाजिक उपक्रमांद्वारे केलेले जनजागृतीपर कार्य याची दखल घेऊन त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. त्यांच्या कार्यामुळे सामाजिक बांधिलकी व मराठी भाषेप्रती असलेला अभिमान अधिक दृढ झाल्याचे मान्यवरांनी यावेळी गौरवोद्गारांतून नमूद केले.
कार्यक्रमात मराठी भाषा संवर्धन, समाजसेवा आणि स्वाभिमान या मूल्यांचा गौरव करण्यात आला. उपस्थितांनी दिलीप नारद यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
