
नांदगाव, ता. २८: येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात मराठी विभाग आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, नांदगाव शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने २७ फेब्रुवारी रोजी कवी कुसुमाग्रज जयंती व मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी मराठी भाषा वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने अर्जलेखन स्पर्धा आणि कवी कुसुमाग्रजांचे मराठी भाषेसाठी योगदान या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
व्याख्यानासाठी मसाप, नांदगाव शाखा अध्यक्ष श्री. सुरेश नारायणे प्रमुख वक्ते म्हणून तसेच सदस्य श्री. बाबुराव मानकरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय मराठे होते.
व्याख्यानात श्री. सुरेश नारायणे यांनी कवी कुसुमाग्रज यांच्या साहित्यावर प्रकाश टाकत मराठी भाषेतील त्यांचे योगदान स्पष्ट केले. कवी कुसुमाग्रजांच्या कविता आणि लेखनाची ओळख त्यांनी करून दिली. सोबतच मराठी भाषेचा गौरव होण्यासाठी सर्वांनी मराठीचा आग्रह धरावा असे प्रतिपादन केले. लेखक बाबुराव मानकरी यांनी मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
मराठी विभागप्रमुख प्रा. योगेश वाघ यांनी प्रास्ताविकातून मराठी भाषा गौरव दिनाची पार्श्वभूमी स्पष्ट करत कवी कुसुमाग्रज यांच्या साहित्याची आणि जीवनाची ओळख करून दिली. सोबतच सर्व मराठी भाषिकांनी कुसुमाग्रजांसम अंतराळात अढळपद मिळविण्यासाठी प्रयत्नशील असावे असे प्रतिपादन केले. अध्यक्षीय मनोगतातून उपप्राचार्य डॉ. संजय मराठे यांनी मराठी भाषेचे महत्त्व व आपल्या जीवनातील स्थान स्पष्ट केले. कार्यक्रमासाठी डॉ. बाबाजी आहिरे, प्रा. ए. एफ. राठोड, प्रा. एम. बी. आटोळे, डॉ. डी. डी. ठाकरे, प्रा. ए. बी. जाधव, प्रा. डी. वाय. तुंगार, प्रा. शिंदे आणि कला व वाणिज्य शाखेचे विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. श्रीमती छाया आहिरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. आभार भूगोल विभागाचे डॉ. बाबाजी आहिरे यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मा. प्राचार्य डॉ. एन. यु. पाटील, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.
