
नाशिकरोड:-( प्रतिनिधी ) विज्ञानाच्या साह्याने मानवाने सर्वांगीण प्रगती केली आहे. आपले आयुष्य वैज्ञानिक दृष्टिकोनातून जगलं पाहिजे. कारण विज्ञानानेच आपले दैनंदिन जीवन परिपूर्ण झाले आहे, असे प्रतिपादन बाळासाहेब गायधनी यांनी केले.
पळसे येथील नासाका कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण पगार होते.
श्री.गायधनी पुढे म्हणाले की, भारतीय वैज्ञानिक, संशोधक आणि शास्त्रज्ञ यांनी विविध प्रकारचे शोध लावले आहेत. त्या शोधांची माहिती घेऊन आपणही वैज्ञानिक जाणिवा जपल्या पाहिजेत. नोबेल पुरस्काराचे मानकरी थोर शास्त्रज्ञ डॉ.सी.व्ही.रमण यांच्यासारख्या भारतीय शास्त्रज्ञांनी केलेलं महत्त्वपूर्ण आहे. विज्ञानाचा वापर करून श्रद्धापूर्वक भावना जपल्या पाहिजे, असेही ते म्हणाले.
मुख्याध्यापक अरुण पगार यांनी अध्यक्षीय भाषणात राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमास विद्यार्थ्यांसह शिक्षक-कर्मचारी उपस्थित होते. शिक्षक रवींद्र मालुंजकर यांनी आभार मानले.
