
नाशिक (प्रतिनिधी ) विविध कारणांमुळे पर्यावरण प्रदूषणामध्ये प्रचंड वाढ होते आहे आणि त्यासाठी माणूसच कारणीभूत आहे हे आता लपून राहिलेले नाही.
पर्यावरणाचा समतोल बिघडल्याने काही ठिकाणी अतिवृष्टी तर काय ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष्य अशी परिस्थिती अनेक ठिकाणी निर्माण होत आहे .
याचा सर्वात जास्त फटका माणसा व्यतिरिक्त इतर सजीवसृष्टीलाच लवकर व मोठ्या प्रमाणात बसतो.
वास्तविक पर्यावरण प्रदूषण करण्यात इतर सजिवांची काहीही भूमिका नसते. उलट ते निसर्गनियमाचे तंतोतंत पालन करीत असतात.
म्हणून कोणत्याही धर्माचे कोणतेही सण, उत्सव, समारंभ हे कालसुसंगत व पर्यावरण पूरक होणे अत्यंत आवश्यक आहे.
झाडे तोडून लाकडे व गोवऱ्या जाळून होळी केली जाते. त्यामुळे नैसर्गिक संपत्तीची हानी होते.
होळीच्या भोवती बोंबा मारण्याबरोबरच, महिलांबाबत अपशब्द उच्चारले जातात.नैवद्य म्हणून कुटुंबातून पुरणाची पोळी,नारळ, खोबऱ्याची वाटी अशा खाद्य वस्तू पेटत्या होळीत टाकतात. होळी पेटवल्यानंतर अपघात होणे, आग लागणे अशा घटना कुठे, कुठे घडतात.
ठरवले तर अशा अनिष्ट गोष्टी सहज टाळता येऊ शकतात.
होळीनिमित्त स्वतःमधील किमान एका दुर्गणाची होळी मी करीन, असा संकल्प प्रत्येकाला करता येईल.
पेटत्या होळीत पुरणाची पोळी,नारळ, खोबऱ्याची वाटी असे खाद्यपदार्थ टाकून ते जाळण्याऐवजी तीच पुरणपोळी आणि इतर खाद्य पदार्थ गरजू, भुकेलेल्यापर्यंत पोहच करून त्यांच्या पोटातील भूकेची आग शमवता येईल .
विशेषतः शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकांनी पूर्वनियोजन करून हा सामाजिक उपक्रम जास्तीत जास्त ठिकाणी राबवावा, असे आवाहन महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ ठकसेन गोराणे, राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे,प्रा. डॉ.सुदेश घोडेराव, राजेंद्र फेगडे, प्रल्हाद मिस्त्री, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. आशा लांडगे, जिल्हा प्रधान सचिव नितीन बागुल, अरुण घोडेराव, महेंद्र दातरंगे विजय बागुल आदींनी केले आहे.
