
[‘भगवान मर्यादा पुरूषोत्तम श्रीराम जंयती’चैत्र शुद्ध नवमी, श्रीविष्णूचा सातवा अवतार श्रीराम यांच्या जन्माप्रीत्यर्थ श्रीराम नवमी साजरी करतात. या दिवशी पुष्य नक्षत्रावर, माध्यान्ही, कर्क लग्नी सूर्यादी पाच ग्रह असतांना अयोध्येत प्रभु श्री रामचंद्रांचा जन्म झालाप्रभु श्रीराम हे भारतीयांचे आदर्श लाडक दैवत. जगकल्याणासाठी, धर्म रक्षणासाठी, दुष्टांच्या र्निदालनासाठी, भगवान महविष्णूंनी जे दशावतार घेतले, त्यामध्ये श्रीराम अवतार हा त्यांचा सातवा अवतार.भगवान विष्णूला सृष्टीपालन करणारा देव मानले गेले आहे. भागवत पुराणानुसार सतयुग ते कलीयुगापर्यंत विष्णूने २४ अवतार घेतले आहेत. त्यामधील दहा प्रमुख अवतार ‘दशावतार’ स्वरुपात प्रसिध्द आहेत.श्रीराम ह्यांचा अवतार झाला तो त्रेता युगात. अयोध्येचा राजा दशरथ आणि त्याच्या तीन राण्या – कौसल्या, सुमित्रा अन् कैकयी ह्यांना एकच दुःख होते. त्यांना पुत्र संतान नव्हते. राजगादीला वारस नव्हता. राज्याला राजपुत्र नव्हते. आपल्याला पुत्र संतान व्हावे म्हणून धर्मनिष्ठ राजा दशरथाने राजगुरूंच्या मार्गदर्शनाखाली पुत्रकामेष्टी यज्ञ केला. यज्ञदेवता अर्थात अग्निनारायण हे प्रसन्न झाले. त्यांनी राजाच्या हातात प्रसाद फळे दिली. तो प्रसाद भक्षण केल्यावर तीनही राण्यांना पुढे उचित वेळी चार पुत्र झाले. त्या राजपुत्रांची नावे राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न अशी ठेवली.श्रीराम हे एक आदर्श पुत्र-पति-बंधू, स्वामी, धर्मरक्षक आणि कर्तव्यदक्ष, प्रजा पालक. श्रीराम हे पितृवचन पालक, मातृभक्त, एकवचनी आणि आदर्श असं व्यक्तिमत्व होय.श्रीरामांनी बालपणीच आपल्या गुरुंच्या यज्ञांचे, धर्माचे संरक्षण केले. दुष्ट राक्षसांचा संहार केला. अहिल्येचा उद्धार करून त्यांनी पतित पावन हे विशेषण खरं केलं. राजा जनकाच्या मिथिलानगरीत जाऊन शिव धनुष्याचा भंग केला.भुमीकन्या सीतेबरोबर विवाह केला. श्रीराम हे अयोध्येचे राजपद भुषवणार म्हणून सारी प्रजा आनंदांत असतानाच मातृ-पितृ आज्ञेचं पालन करीत त्यांनी चौदा वर्षाचा वनवास स्वीकारला. सीता हरणाच्या निमित्त्याने लंकाधिपती रावण आणि त्याची राक्षस सेना ह्यांचा वध केला.मर्यादा पुरूषोत्तम हे श्रीरामांचे आणखी एक वैशिष्ट्य. श्रीरामाचे जीवन, त्यांची कर्तव्य निष्ठा, संयम, शौर्य, औदार्य हे सारं सारंच कसं अगदी वंदनीय आणि आचरणीय.ह्या आदर्श देव अवताराची आपल्याला सदैव आठवण रहावी. त्यांचा आदर्श आणि ते गुण आपण काही अंशी तरी आपल्यात उतरावेत म्हणून हे रामजन्माचे निमित्य. मध्यान्ह काळी म्हणजे दुपारी बारा वाजता रामजन्माचा पाळणा म्हणून हा राम जन्मोत्सव केला जातो. सुंठवडा वाटला जातो.जय श्रीराम


