
चित्रकार संजयजी पाडवी यांचा अभिप्राय. नवा-कोरा ग्रंथ वसा.*क्रांतीकारक सरदार भगतसिंह* (चरीत्र)लेखक – जनार्दन देवरे.*लाडोबा प्रकाशन* पुणे. *प्रकाशक* – घनश्याम पाटील , पुणे. *मुद्रक* – शिवानी प्रिंटर्स , कसबा पेठ , पुणे. *पहिली आवृत्ती* – २१ फेब्रुवारी २०२५ *मुखपृष्ठ , आतील चित्र संकल्पना* – ज्योती घनश्याम *अंतर्गत मांडणी* – मयुरी मालुसरे*मूल्य* – १००/
लेखक जनार्दन देवरे हे एक उत्तम कवी तर आहेतच पण एक हाडाचे शिक्षक देखील आहेत.ते नुकतेच जिल्हा परिषद सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत. सेवानिवृत्त जरी झाले तरी विद्यार्थ्यांशी असलेली नाळ अजूनही ते कायम टिकवून आहेत. नोकरी करीत असताना जो वेळ त्यांना मिळाला नाही , व जे विद्यार्थ्यांसाठी करावयाचे होते , ते करायला वेळ मिळाला नाही , तेच आता वेळ असल्यामुळे पण विद्यार्थ्यांवर अतिव प्रेम असल्यामुळे विद्यार्थ्यांना हवेहवेसे असलेले विषय ते हाताळतायेत ही फार मोठी व आनंदाची बाब आहे. साचेबद्धअभ्यासक्रमामुळे मुलांचा सर्वांगीण विकास खुंटतोय की काय? अशा अवस्थेत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मानसिक अभ्यासाची भूक मिटविण्याची जबाबदारी पुन्हा एकदा अस्सल मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांवर येऊन ठेपते. जिथे क्रांतिकारक म्हणजे काय? पूर्वीचे लोक क्रांती करायचे म्हणजे काय? काळ्यापाण्याची शिक्षा म्हणजे काय? उपोषण , सत्याग्रह , दांडी यात्रा म्हणजे काय? असे अनेक प्रश्न बाल-कुमार मित्रांना पडत असतात. आणि ते आपल्या शिक्षकांना असे प्रश्न वारंवार विचारत असतात. बऱ्याचदा सर्वच शिक्षकांना या प्रश्नांची उत्तरे वेळेअभावी सविस्तर देणे शक्य होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे समाधान होत नाही , या अशा अनेक बाबी उपक्रमशील शिक्षक असलेले कवी जनार्दन देवरे यांच्या निदर्शनास आले असावेत म्हणूनच त्यांनी खास आपल्या बाल-कुमार मित्रांसाठी व माय मराठीच्या प्रेमात पडलेल्या जगातील सर्व बालमित्रांसाठी हे पुस्तक लिहलेले आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर क्रांतिकारकांचे विचार विद्यार्थ्यांनी थोडे बहुत पाठ्यपुस्तकातून अभ्यासलेच असतात पण सर्व क्रांतिकारकांबाबत प्रत्येक मुलाच्या मनात एक अनामिक उत्सुकता असते. हे एक हाडाचे शिक्षक म्हणून जनार्दन देवरे यांनी जाणून घेतले. म्हणूनच ‘ क्रांतिकारक सरदार भगतसिंह’ यांचे जीवन चरित्र आपल्या बालमित्रांना कळायला हवे या भावनेतून हे छोटे चरित्र लिहिले आहे. गुलामगिरीच्या श्रृंखला तुटाव्यात ,देशास स्वातंत्र्याचा सूर्य पाहता यावा म्हणून सशस्त्र क्रांतिकारकांनी आपले प्राण देऊन संकल्पपूर्तीच्या उंबरठ्यावर आणले होते. त्यांचे स्मरण सदैव देशवासियांसाठी प्रेरणादायी ठरले. क्रांतिवेदीवर हसत हसत भारत मातेचा जयघोष करीत फासावर चढणाऱ्या या क्रांतिकारकाचे छोटे चरित्र वाचून आजच्या बालमित्रांच्या मनातही देशभक्तीचे स्फुल्लिंग जागवावे म्हणून लेखक जनार्दन देवरे यांनी केलेला हा पुस्तक प्रपंच म्हणूनच स्तूत्य व वाचनीय आहे. तारुण्याच्या वयात ज्यांनी देशासाठी हसत हसत बलिदान दिलं आणि क्रांतीचा आवाज बुलंद केला. ते थोर देशभक्त म्हणजे सरदार भगतसिंह. माय भूमीच्या रक्षणासाठी देह कामी आला तर ते आपलं सौभाग्य ठरेल असा विचार कृतीतून अमलात आणणारे भगतसिंह हे खरे आपले आदर्श आहेत. जनार्दन देवरे यांनी या छोटेखानी पुस्तकातून ‘शहीद -ए-आजम ‘ सरदार भगतसिंह यांच्या जीवन आणि चरित्राचा अचूक वेध घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्तीची ज्वाला प्रज्वलित ठेवणारे हे पुस्तक मुलांनी आणि पालकांनी वाचायलाच हवे. यातून आपल्या देशाची त्याग आणि समर्पणाची परंपरा दिसून येते. एक अतुलनीय धाडस आणि पराकोटीच्या संघर्षातही कायम उंचावलेले मनोधैर्य याची शिकवण मिळते. देशभक्ती म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर समजून घ्यायचे असेल तर त्यासाठी भगतसिंहासारख्या क्रांतिवीराचे चरित्र वाचायला हवे. या पुस्तकातून सरदार भगतसिंह यांच्याविषयीची माहिती तर मिळतेच पण स्वातंत्र्य चळवळीतील अन्य क्रांतिकारकांचा अभ्यास करण्याची प्रेरणा ही जागृत होते. छत्रपती श्री शिवाजी महाराजांना आदर्श मानणाऱ्या आणि आपल्या प्राणाची किंमत मोजून आपल्याला स्वातंत्र्याचा आनंद मिळवून देणाऱ्या सरदार भगतसिंह यांचे चरित्र नक्कीच वाचायला हवे. सरदार भगतसिंह यांनी त्यावेळी अनेक संघटनांसोबत काम केले. त्यात प्रामुख्याने ‘ नौजवान भारत सभा ‘ , ‘ कीर्ती किसान पार्टी ‘ , ‘ हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ‘ इत्यादी संस्था व संघटनांबरोबर ते कायम जोडले गेले. यासोबतच त्यांनी पत्रकारिता व लेखनकार्य चालू ठेवले. ‘ अकाली ‘ या वृत्तपत्रात लेखन , तर ‘ मेरा आयरिश स्वतंत्रता संग्राम ‘ हे अनुवादित पुस्तक लिहिले. त्यांच्या विचारांवर नेहमी मार्क्स , लेनिन , बकुनी , समाजवाद , कम्युनिस्ट , या विचारांचा प्रभाव असायचा. त्याचप्रमाणे चंद्रशेखर आझाद यांच्या व्यक्तित्वावर ते कायम प्रभावित राहिले आहेत. असे हे क्रांतिकारकांमधील उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे सरदार भगतसिंह. भगतसिंहांचा वाचन व्यासंग दांडगा होता. क्रांतीसाहित्याने त्यांना जणू झपाटून टाकले होते. सचिंद्रनाथ संन्याल यांचे ‘बंदी जीवन ‘ हे त्यांना प्रभावित करणारे बहुदा पहिले पुस्तक असावे. परदेशातील अनेक देशभक्तांची चरित्रे व समाजक्रांतीचे अनेक ग्रंथ त्यांनी अभ्यासले होते. जर क्रांती व्हायला हवी असेल तर समाजाची मानसिकता त्या दृष्टीने घडवली पाहिजे व तसे होण्यासाठी क्रांतीवाङ्मयाचा प्रचार अपरिहार्य आहे. असे त्यांचे मत होते. भगतसिंह हे उत्तम वक्ते होते. १९२४-२५ च्या सुमारास बेळगाव येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनात ते ‘ अकाली ‘ या पत्राचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. अधिवेशन संपल्यानंतर ते त्यांचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीत म्हणजे रायगडावर गेले. तेथील पवित्र माती त्यांनी आपल्या कपाळाला लावून स्वातंत्र्याच्या प्रतिज्ञेचा पुनरुच्चार केला. पत्रकार म्हणून त्यांनी ‘वीर-अर्जुन’, ‘प्रताप ‘ इत्यादी दैनिकात काम केले होते. महाविद्यालयीन जीवनात पंजाबातील हिंदी साहित्य संमेलनानिमित्त पारितोषिकासाठी विद्यार्थ्यांकडून मागविलेल्या निबंधात ‘ नॅशनल कॉलेज ‘ तर्फे पाठवण्यात आलेला भगतसिंहांचा निबंध अव्वल ठरला होता. भगतसिंह यांनी ‘राणा प्रताप’,’दुर्दशा ‘ , ‘ सम्राट चंद्रगुप्त ‘ या नाटकांतून भूमिकाही केल्या होत्या. पुढे सरकारने या नाटकांवर बंदी घातली. असे हे उत्तुंग व्यक्तिमत्व अभ्यासायलाच हवे. सरदार भगतसिंह यांचे अमृतसर ते चंदिगड मार्गावर असलेले खटकरकलाॅं येथे वडिलोपार्जित घर आहे. तिथे ‘ हुतात्मा भगतसिंह स्मृतीसंग्रहालय ‘ आहे. संग्रहालय सोमवारी बंद असते. येथे अनेक दुर्मिळ फोटो आहेत. हुतात्मा भगतसिंह यांची स्वाक्षरी असलेली , त्यांना लाहोर तुरुंगात भेट दिलेली भगवद्गीतेची प्रत देखील ठेवली आहे. अशा पवित्र वास्तूस भेट देणेदेखील एक ऊर्जावान विचार घेऊन येण्यासारखे आहे. कवी व लेखक जनार्दन देवरे यांनी सेवानिवृत्तीनंतर देखील आपल्या बाल मित्रांसाठी एक अनोखी भेट या पुस्तकाच्या रूपाने दिलेली आहे. आजही या उपक्रमशील शिक्षकाने आपले व विद्यार्थ्यांचे नाते तुटू दिलेले नाही.हे खासच.या पुस्तकाच्या निमित्ताने आपण देखील त्यांना भावी लेखन कार्यासाठी शुभेच्छा देऊयात आणि नवा कोरा लेखनवसा जपूयात. 🔸 *संजय पाडवी , चांदवड.* संपर्क -९८२२८९८६७०.
