
नाशिक (प्रतिनिधी )मराठी राजभाषा दिनानिमित्त श्रीमान टी. जे. चव्हाण माध्यमिक विद्यालय येथे आगळावेगळा आणि देखणा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. व्यासपीठावर प्रतीकात्मकरीत्या कुसुमाग्रज, पु. ल. देशपांडे, मंगेश पाडगावकर, बहिणाबाई चौधरी आणि शांता शेळके हे साहित्यविश्वातील दिग्गज कवी-कवयित्री अवतरले होते—अर्थातच त्यांच्या वेशभूषेत सजलेले विद्यार्थी!
विद्यार्थ्यांनी संबंधित कवींचे व्हिडिओ-ऑडिओ ऐकून त्यांच्या शैलीचे बारकावे आत्मसात केले आणि त्याच शैलीत कविता, मनोगते व नाट्यअंश सादर केले. या जिवंत सादरीकरणाने उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. किशोर झोटिंग यांच्या हस्ते प्रतिमापूजन व हस्तलिखितांचे प्रकाशन करून झाली. विद्यालयाच्या गीतमंचाने मराठी गीतांचे सुरेल सादरीकरण संगीत शिक्षिका सौ. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली केले. मराठी राजभाषा दिनाविषयी अधिक माहिती उपशिक्षिका सौ हेमांगी खैरनार यांनी सांगितली व सूत्रसंचालन कु अनुजा डोमाडे हिने प्रभावीपणे पार पाडले. कार्यक्रमास माननीय मुख्याध्यापिका सौ. उज्वला माळी यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
एकूणच, दिग्गज कवींच्या प्रतीकात्मक उपस्थितीत रंगलेल्या या उपक्रमातून मराठी भाषेचा जागर विद्यार्थ्यांच्या मनामनात अधिक दृढपणे रुजला.
