
लासलगाव, दि. २८ (प्रतिनिधी ) येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आज दिनांक २८ फेब्रुवारी रोजी रसायनशास्त्र विभागाच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. आदिनाथ मोरे यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक विज्ञानातील नव्या संधींबद्दल मार्गदर्शन करतांना शाश्वत विकास आणि नवोन्मेष यावर विशेष भर दिला. भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळविणारे पहिले भारतीय वैज्ञानिक सर सी. व्ही. रमण यांच्या जिवनकार्यावर प्रकाशझोत टाकत त्यांनी विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञान, ऊर्जा स्रोत आणि स्मार्ट शेती इत्यादी क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण कल्पना विकसित करणे ही काळाची गरज असल्याचे अधोरेखित केले. राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून रसायनशास्त्र विभागांतर्गत रंगावली स्पर्धा, भित्तीपत्रके प्रदर्शन आणि विज्ञान प्रश्नमंजुषा तसेच आवर्तसारणीवर आधारित स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत उत्कृष्ट सादरीकरण केले. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.बाजीराव अहिरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमास प्रा.डॉ. दत्तात्रय घोटेकर, प्रा.अर्चना माळी, प्रा.पुजा शिंदे, प्रा.मोहन आहेर, प्रा.स्वप्निल जाधव, प्रा.वैशाली उगलमुगले, प्रा.विद्या आवारे आणि रसायनशास्त्र विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
