
मखमलाबाद ता. नाशिक दि. 27/ 2/ 26
मध्ययुगीन महाराष्ट्राच्या प्रारंभिक काळात महानुभाव सांप्रदायातील आद्य कवयित्री महदंबा आणि वारकरी भक्ती चळवळीतील संत मुक्ताबाई, व संत जनाबाई या महान संत कवयित्रींनी केलेल्या काव्य रचना म्हणजे आधुनिक समाज परिवर्तनाची नांदी ठरल्या असे गौरवोद्गार प्रसिद्ध साहित्यिक व वक्ते डॉ. नारायण पाटील यांनी मखमलाबाद महाविद्यालयात केले . मखमलाबाद येथील मविप्र संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयात आयोजित मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात “फिरुनी नवी जन्मेन मी” या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून श्री पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संचालक श्री रमेशआबा पिंगळे होते. तर मंचावर नाशिक महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक श्री वाळूभाऊ काकड, शाळा व्यवस्थापन सदस्य श्री बाळासाहेब पिंगळे ,महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचे सह संपादक श्री प्रल्हाद मिस्री आदि मान्यवर उपस्थित होते. आपल्या अभ्यासपूर्ण मनोगतातून डॉ. नारायण पाटील यांनी सांगितले की,ज्या काळात स्त्रियांना घराच्या बाहेर कोणतेही अधिकार नव्हते अशा तात्कालीन प्रतिकूल सामाजिक परिस्थितीतील महादंबा,मुक्ताई व जनाई यांनी समाजाचे प्रबोधन करून काव्यनिर्मिती केली अशा महान विभूतींच्या जीवनकार्याचा परामर्श घेत ओवी व अभंगांचे काव्यमय सादरीकरण केले. प्रारंभी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मनीषा आहेर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून आपण कोणत्याही विषयाचे व शाखेचे शिक्षण घेतले तरी मातृभाषेच्या अभ्यासाशिवाय ते अपूर्ण असते असे सांगितले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना श्री रमेशआबा पिंगळे यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मराठीतील चांगल्या साहित्यकृतींचे वाचन करून आपले व्यक्तिमत्व संपन्न करावे असे प्रतिपादन केले. मराठी विभाग प्रमुख प्रा. श्रीमती अर्चना धारराव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांचे जीवन कार्य आणि ठळक साहित्य कृतींचा परिचय करून दिला. मराठी विभाग प्रा.वर्षा वाघ यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी महाविद्यालयीन ग्रंथालयात आयोजित ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी ,प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
