
नांदगाव:– (प्रतिनिधी ) मराठी भाषेचे भूषण, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त ‘मराठी भाषा गौरव दिन’ मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाद्वारे मराठी भाषेचा वारसा जपण्याचा आणि तिचे संवर्धन करण्याचा संकल्प करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका ज्योती काळे, उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण, पर्यवेक्षक अविनाश शेवाळे व उपस्थितांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आली.

विद्यालयातील गीतमंच्याने “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी…” या गीताचे सादरीकरण केले.
विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रजांच्या कवितांचे सादरीकरण केले. तसेच ‘मराठी भाषेचे महत्त्व’ या विषयावर ओघवती भाषणे दिली.
याप्रसंगी बोलताना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ज्योती काळे म्हणाल्या की, “मराठी ही केवळ आपली भाषा नसून ती आपली संस्कृती आणि ओळख आहे. दैनंदिन जीवनात मराठीचा जास्तीत जास्त वापर करणे आणि वाचन संस्कृती जोपासणे हीच कुसुमाग्रजांना खरी श्रद्धांजली ठरेल.”
या सोहळ्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक समिती प्रमुख शरद आहेर यांनी केले.
