

लेखक : डॉ. गोरखनाथ सुकदेव देवरे, रिटायर्ड मेडीकल ऑफिसर.स्वामी विवेकानंद नगर , येवला रोड, नांदगाव, जिल्हा नासिक
!!आत्मा मालिक गुरु ॐ गुरु ओम्॥ हरिपाठ अभंग विंतन- असोनि संसारी जिव्हे वेग करी। वेदशास्र उभारी बाह्या सदा॥३॥ ज्ञानदेव म्हणे व्यसाचिये खुणा। द्वारकेचा राणा पांडवा घरी॥४॥ परमेश्वर प्राप्तीचा अधिकार सर्वांना आहे, मग तो संन्यासी असो किंवा प्रापंचिक असो। त्यासाठी संन्यायसच घेतला पाहिजे असे नाही। जे प्रापंचिक आहेत त्यांचे साठी ज्ञानेश्वर महाराजांनी या अभंगात उपदेश केला आहे। संसारात असले तरी काय झाले? संसारात ईश्वरभक्ती करणे म्हणजे प्रपंचात परमार्थ करणे। संसारात असून सुध्दा जिव्हे वेग करी, म्हणजे जिभेने वाणीने हरिनामाचा उच्चार करावा, नाम स्मरण करावे। तरी ईश्वरप्राप्ती होईलच असे वेदादि शास्र बाह्या ऊभारुन म्हणजे खात्रीने सांगतात। समर्थ रामदास स्वामी संन्यासी होते तरी त्यांनी प्रापंचिक माणसांना उपदेश केला। आधी प्रपंच करी नेटका। मग परमार्थ साधी वेवेका॥ दासबोध॥ अगोदर नीटनेटका प्रपंच करावा, नंतर परमार्थ साधावा। गृहस्थी मनुष्याने आपले गृहास्थश्रमातील कर्तव्य योग्य प्रकारे पार पाडावे। मनुस्मृति मधे १ श्लोक आहे,” ऋणाणि त्रिणि अपाकृत्य, मनो मोक्षे निवेशयेत्॥” अगोदर ३ ऋण पितृऋण, देवऋण, ऋषिऋण फेडावे नंतरच मोक्षाचा विचार करावा। ब्रम्हचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास या ४ आश्रम धर्मांची उत्पत्त्ति ईश्वरानेच केली। त्यात आपल्या वाट्याला जो धर्म आला त्याचे पालन आपण केलेच पाहीजे। भगवद्गीतेत या आश्रम धर्मांचे महत्व स्वत: भगवान श्रीकृष्णांनी सांगीतले आहे। आपल्या वाट्याला आलेले कर्म, धर्म तोच आपल्यसाठी स्वधर्म आहे। दुसर्याचा हेवा न करता आपल्या स्वधर्माचे पालन करावे हाच आपल्यासाठी स्वधर्म आहे। “स्वधर्मे निधनं श्रेय: परधर्मो भयावह:॥ गीता॥ बाबा मुक्तानंदांनी म्हटले आहे, “संसार को त्यागो मत। संसार भ्रम को त्यागो।” घरदार सोडून जंगलात गेला तरी तेथे संसार आहेच। हे संपूर्ण जग च संसार आहे। संसाराचा त्याग आपण करुच शकत नाही। फक्त त्याविषयी आसक्ती नको इतकेच। पद्मिनीपत्रवत् तोयं-कमळाच्या पानावर पाण्याचे थेंब असले तरी त्यावर राहून ते अलिप्त असते, पाण्याला चिकटत नाही। त्याप्रमाणे प्रपंचात राहून त्यापासून अनासक्त राहण्याची कला साधली पाहिजे। “मैं-मेरा त्यागो। घर नहीं” बाबा मुक्तानंद। त्यासाठीच गीतेत कर्मयोगाचा विषय आहे। “योग: कर्मसु कौशलम्।” कर्मातील कौशल्य म्हणजेच “योग” अशी योग शब्दाची व्याख्या भगवद्गीतेत आहे। विदेही जनका सारखे राजे होऊन गेले, प्रापंचिक असून त्यांनी कर्मयोगाची अशी कला साध्य केली होती, की शूक देवा सारखे संन्यासी मुनी सुध्दा जनकाकडे ब्रम्हज्ञानाचा उपदेश घ्यायला येत असत। अनेक संत प्रापंचिक आहेत, तरी त्यांना ईश्वराचा प्रत्यक्ष साक्षात्कार झालाच। बाबा मुक्तानंदांनी तर एका ठिकाणी त्यांच्या उपदेशात म्हटले आहे, “ईश्वर प्राप्ती साठी संन्यास धेण्याची मुळीच आवश्यकता नाही।” संसार-जगत्-प्रपंच हे तिन्ही समानार्थी शब्द आहेत। जगद् ब्रम्हस्वरुप आहे हा सिध्दांत आपण देव शब्दाचा विचार करतांना समजून घेतला आहे। संसरति इति संसार: जे सतत परिवर्तनशील आहे त्याला संसार म्हणतात, गच्छति तत् जगत् जे सतत जात असते, बदलते ते जग, ज्यात फक्त ५ सुखे-शब्द-स्पर्श-रुप-रस-गंध हे विषय आहेत त्याला प्रपंच असे नाव आहे। उपनिषदामध्ये १ मंत्र आहे, ” एतस्यैवानंदस्यान्यानि भूतानि मात्रामुपजीवन्ति।” विषय सुख सुध्दा ईश्वराचाच प्रत्यक्ष अंश आहे, त्याच आनंदाच्या अंशावर हे प्राणिमात्र आनंदाने जगतात। अध्यात्मात कोणत्याही गोष्टीचे ज्ञान झाले तर ते बाधक होत नाही। जग हे बाधक नसून साधकाला साधक आहे। जगातील वस्तुंनीच आपण साधना करु शकतो। आसन, श्वास, हवा, पाणी, साधना कुटी, या सर्व गोष्टी संसारातीलच आहेत। योग्य समज होण्यासाठीच अध्यात्म ज्ञान आवश्यक आहे। संत तुकराम महाराज याविषयी म्हणतात,”
“नामसंकीर्तन सधान पैं सोपे। जळतील पापे जन्मांतरीची॥१॥ न लगती सयास जावे वनांतरा। सुखे येतो घरा नारायण॥२॥ ठायींच बैसोनि करा एकचित्त। आवडी अनंत आळवावा॥३॥ रामकृष्णहरि विठ्ठल केशवा। मंत्र हा जपावा सर्वकाळ॥४॥ याविण असता आणीक साधन। वाहातसे आण विठोबाची॥५॥ तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनि। शाहाणा तो धनी घेतो येथे॥६॥ [१६९८] आत्यंत दृढ श्रध्देने परमेश्वराचे नाम-संकीर्तन करणे हे अगदी सोपे साधन आहे। यामुळे जन्मोजन्मीवे पापे, बंधने जळून जातील। ईश्वर प्राप्तीसाठी घरदार सोडुन, अरण्यात जाऊन कठोर साधना, तप, करण्याचे कष्ट घेण्याची गरज नाही। भक्ती केल्याने ईश्वर सहजपणे आपल्या घरीच येतो, भेटतो, कारण तो सर्वव्यापी आहे, आपल्या आतच आहे। तुम्ही ज्या ठिकाणी आहात तेथेच राहा एकचित्ताने ईश्वराचे स्मरण करा, प्रेमाने त्याला आळवावे। संतांना शपथ घेण्याची मुळीच गरज नाही, कारण संतांचा शब्द त्रिकालाबधीत सत्य असतो, तरी तुकाराम महाराज म्हणतात, मी विठोबाची शपथ घेऊन सांगतो कि नामस्मरणाने ईश्वर खात्रीने सहजपणे प्राप्त होतो। संसारात राहून ईश्वराचे नामस्मरण, भक्ती केल्याने ईश्वर खात्रीने प्राप्त होतो हेच ज्ञानेश्वर महाराजांना या अभंगातून सांगायचे आहे।
