
नांदगाव ( प्रतिनिधी ):विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज व्ही. जे. हायस्कूलमध्ये अभिवादनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख वक्ते म्हणून विद्यालयाचे उपमुख्याध्यापक मा. डॉ. नांदुरकर यांनी मार्गदर्शन केले. आपल्या मनोगतात त्यांनी सावरकरांचे क्रांतिकारी कार्य, स्वातंत्र्यलढ्यातील त्याग आणि पराक्रम यांचा सविस्तर आढावा घेतला. स्वातंत्र्यवीरांचा इतिहास म्हणजे त्याग, राष्ट्रभक्ती आणि अदम्य धैर्याची पराकाष्ठा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यानंतर इयत्ता ८वी ‘क’ च्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कु. प्रशांत आहेर, कु. कृष्णा लहिरे, कु. यश काकळीज आणि कु. अर्णव इपर यांनी सावरकरांच्या विचारांवर प्रकाश टाकत त्यांना अभिवादन केले.

तसेच डॉ. नांदुरकर सरांनी सावरकरांवर स्वलिखित ‘नम्र वंदना’ हे गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमास अकॅडेमिक बोर्ड सदस्य भास्कर मधे, शिक्षक प्रतिनिधी प्रवीण अहिरे, ज्येष्ठ शिक्षक विलास काकळीज, चंद्रकांत दाभाडे, जोशी, सांस्कृतिक प्रमुख श्रीमती संगीता शिंदे तसेच सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता ८वी ‘क’ चा विद्यार्थी कु. साई बोडके यांनी केले, तर आभार प्रदर्शन कु. यश डोळे यांनी केले.
कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर वेशभूषा सादरीकरण कु. साई खैरनार यांनी केले. फलकलेखनाचे काम चव्हाण सर यांनी केले, तर छायाचित्रण व व्हिडिओ चित्रिकरणाची जबाबदारी दाभाडे सर यांनी पार पाडली.
या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना देशभक्ती, त्याग आणि राष्ट्रसेवेचे मौलिक धडे मिळाले.
