
नांदगाव :-(प्रतिनिधी ) — मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव मध्ये नऊवे शीख गुरु, ‘हिंद दी चादर’ गुरु तेग बहादूर जी यांच्या शौर्याला आणि बलिदानाला समर्पित ‘हिंद दी चादर’ हा कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमातून गुरुजींच्या मानवतावादी विचारांचा जागर करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाच्या उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण यांच्या हस्ते गुरु तेग बहादूर जी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी अत्यंत भक्तीभावाने गुरुवाणी आणि शबद कीर्तन सादर केले.
विद्यालयातील शिक्षक राजेंद्र कदम यांनी गुरु तेग बहादूर जी यांना ‘हिंद दी चादर’ का म्हटले जाते, यावर प्रकाश टाकला. औरंगजेबाच्या जुलुमाविरुद्ध त्यांनी दिलेला लढा आणि काश्मिरी पंडितांच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान याबद्दल माहिती देण्यात आली.
विद्यालयाचे उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण म्हणाले की, “गुरु तेग बहादूर जी यांनी केवळ एका धर्मासाठी नव्हे, तर संपूर्ण मानवतेच्या हक्कासाठी बलिदान दिले. त्यांचे जीवन आपल्याला धैर्य आणि निस्वार्थ सेवेची शिकवण देते. आजच्या पिढीने त्यांचे हे विचार आचरणात आणणे गरजेचे आहे.”
या प्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
