
शिक्षणाचा प्रचार ,प्रसार झाल्यानंतर शिक्षणात जाणिवपूर्वक समाविष्ट केलेला वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होईल आणि त्यामुळे समाजातील अंधश्रद्धा हळूहळू कमी होत जातील, अशी अपेक्षा होती.
मात्र आज बऱ्यापैकी शिक्षणाचा प्रचार, प्रसार होऊनही अंधश्रद्धांचे प्रकार, प्रमाण, स्वरूप आणि त्यांचे दुष्परिणाम वाढताना दिसतात. त्यातून समाजाचे विविध प्रकारे मोठ्या प्रमाणात शोषण होताना दिसते.
चमत्कार करणाऱ्या भोंदूबुवांचे काळेकारनामे मधून मधून उघडकीस येतात.
स्वतःच्या अंगात दैवी शक्ती असल्याचे भासवून तंत्र- मंत्र, चमत्कार, दैवी तोडगे याद्वारे अंधश्रद्धेच्या गर्तेत सापडलेल्या लोकांचे विविध प्रकारे शोषण हे भोंदूबुवा करतात .
हे अनिष्ट , अघोरी, अमानुष प्रकार थांबवण्यासाठी महाराष्ट्र अंनिस मागील सदतीस वर्षांपासून संघटितपणे समाजातील अंधश्रद्धांचे निर्मूलन करणे व समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचे काम करीत आहे .
परिणामी समाजातील अनेक अनिष्ट, अघोरी ,अमानुष रूढीं, प्रथां थांबवण्यात संघटनेला बऱ्यापैकी यश मिळालेले आहे .
अनेक अंधश्रद्धांबद्दल मोठ्या प्रमाणात समाजात जनजागृती करण्यात अंनिस यशस्वी झालेली आहे.
मात्र तरीही, आजही अनेक भोंदू बुवा देव ,धर्म,अध्यात्म्याच्या नावाने भोंदूगिरी करतात. चमत्कारांचा दावा करतात.
म्हणून या पत्रकारद्वारे अशा तमाम चमत्काराचा दावा करून भोंदूगिरी करणाऱ्या भोंदूबाबांना महाराष्ट्र अंनिसचे जाहीर आव्हान आहे की त्यांनी, त्यांचे चमत्कारांचे दावे आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर व संघटनेचे नियम-अटी- शर्ती पाळून सिद्ध करावेत .
असे केल्यास त्यांना, संघटनेने या आव्हानासाठी ठेवलेली एकवीस लाखांची रक्कम बक्षीस म्हणून मिळेल.
तत्पूर्वी तमाम लोकांनाही नम्र आवाहन करण्यात येते की त्यांनी स्वतः अशा चमत्कारांना , अंधश्रद्धांना बळी पडू नये. भोंदू बाबांच्या नादी लागू नये. असा भोंदूगिरीचा प्रकार कुठे घडत आहे, असे दिसून आले तर तत्काळ पोलिसांना कळवावे किंवा महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांना कळवावे.
पत्रकावर अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ ठकसेन गोराणे, राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे
यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
