
सिन्नर (प्रतिनिधी ) इतिहास अभ्यासक व गोंदेश्वर मंदिराच्या स्थापत्यशैलीवर काम करणाऱ्या प्रा.जावेद शेख यांनी गोंदेश्वर मंदिर बांधणाऱ्या दानकर्त्याचे शिल्प पहिल्यांदाच उजेडात आणले आहे.यापूर्वी सुद्धा प्रा.जावेद शेख यांनी नाशिक जिल्ह्यातील पहिली सतीशिळा त्रिंगलवाडी किल्ले परिसरातून उजेडात आणली आहे.
शतकानुशतके स्थापत्यकला व इतिहास अभ्यासक यांच्या नजरेआड राहिलेले दानकर्त्याचे शिल्प उजेडात आल्यामुळे गोंदेश्वर मंदिराच्या स्थापत्य अभ्यासाला व इतिहासाला गती मिळणार आहे.भक्त ,भाविक ज्यावेळेस पंचायतन मंदिर गोंदेश्वर मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करतात त्यावेळेस या सुंदर मंदिराची भव्यता,उतुंगपणा व आखीव रेखीवपणा पाहिला की,पहिला प्रश्न पडतो की हे मंदिर कोणी बांधले असावे? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला इतिहासात शोधावे लागतात परंतु इतिहासाचा सगळा धुंडाळा घेतला तरी आपल्याला या गोंदेश्वर मंदिर बांधणी संदर्भातला ना कुठला शिलालेख आढळतो ना कुठले ताम्रपट.गोंदेश्वर मंदिर बांधण्यासंदर्भाचा पहिला अस्सल उल्लेख मिळतो तो फक्त सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामी महाराजांच्या गोंदेश्वर मंदिरापुढे पद्मेश्वरू कथन पूर्वार्ध लीळा क्रमांक २४५ यामध्ये.त्याचे कथन पुढीलप्रमाणे –
एकु दीसिं गोसावी गोंदेस्वराचेया देऊळासि वीहरणासि बीजे केले : भगतिजनासहीत :…..सर्वज्ञ म्हणीतीले :बाइ : हा गोंदेस्वरू :हे मागा गोविंदे नामे वेव्हारा तेणे केले: पुढा पदमेस्वरू….
सदर लिळेमध्ये श्रीचक्रधरस्वामी महाराज सांगतात की,गोंदेश्वर मंदिर गोविंद नावाचा व्यापाऱ्याने बांधलेला आहे.परंतु गोविंदराजा कोण ? धनाढ्य व्यापारी होता की यादव राजातील वंशावळीतील राजकुमार या संदर्भात इतिहासकारांमध्ये वेगवेगळे मत मतांतरे आहे.परंतु यादव राजा मल्लुगी (पहिला ) याचा पुत्र युवराज गोविंदराजा याने सदर मंदिर बांधले असावे अशी ऐतिहासिक दाट शक्यता आहे.
या संदर्कुभातला कुठलाही लेखी ऐतिहासिक पुरावा आज जरी उपलब्ध नसला तरी एक जिवंत साक्ष गोंदेश्वर मंदिर बांधणाऱ्या व त्यासाठी दान करणाऱ्या गोविंदराजाचे शिल्प आपणास गोंदेश्वर मंदिरात आहे याचे समाधान व आनंद दिल्याशिवाय राहात नाही.
शतकानूशतके आपल्या श्रद्धाभावाने भगवान महादेव शंकराच्या आशिर्वादासाठी नम्र भक्तिभावाने उभे असलेल्या व ज्याकडे अनवधानाने आतापर्यंत दुर्लक्ष झाले होतेअश्या गोविंदराजचे शिल्प प्रकाशझोतात येत आहे ही ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाची बाब आहे.
पूर्वद्वारातून मुख्य सभामंडपाच्या आत प्रवेश केल्यानंतर उत्तर-पूर्व स्तंभावरती खाली कोष्टकात आपणास एक मानवी आकृती गर्भगृहाकडे अंजली मुद्रेत दिसून येते.अंजली मुद्रा ही भक्तीचे, शरणाचे व नम्रभावाचे प्रतीक आहे.सदर शिल्पातील मानवी आकृतीला दाढी असून अंगावरती मोजके व साधे सोवळे,साधे व कमी अलंकार व कानात कुंडल धारण केलेले आहे.उजव्सया कानाच्दया मागे केसांचा अंबाडा बांधलेले आहे.सदर शिल्प हे दानकर्त्याचे आहे हे ठरविण्यापूर्वी आपणास प्राचीन शिल्पग्रंथाचा आधार घ्यावा लागतो. भारतीय शिल्पकला आणि आगम शास्त्रांमध्ये दानशूर व्यक्ती किंवा ‘दानपती’ यांची शिल्पे कशी असावीत, याबद्दल सविस्तर वर्णन दिले आहे. जेव्हा एखादा राजा किंवा श्रीमंत व्यक्ती मंदिर बांधते, तेव्हा त्या मंदिरात त्यांची ‘प्रतिकात्मक’ मूर्ती स्थापित केली जाते.
शिल्पशास्त्रातील विविध ग्रंथांनुसार दानकर्त्याच्या शिल्पासाठी खालील काही महत्त्वाचे संदर्भ आणि नियम आहेत:
१. मानसार या प्राचीन वास्तुशास्त्र आणि शिल्पकलेच्या अत्यंत महत्त्वाच्या ग्रंथात ‘भक्त लक्षण’ विभागात दानकर्त्याच्या मूर्तीचे वर्णन येते.
श्लोक
अञ्जलिं सम्पुटं कुर्यात् हृदये विन्यसेत्तु सः ।
किञ्चित् प्रहसितास्यं च भक्तिश्रद्धायुतं तथा ॥
दानकर्ता हा सहसा ‘अंजली मुद्रा’ (हात जोडलेली स्थिती) मध्ये असावा असे मानले जाते.
शिल्पप्रकाश ओडिशामधील या प्रसिद्ध शिल्पग्रंथात दानशूर राजा किंवा ‘यजमान’ यांच्या शिल्पाबद्दल सांगितले आहे:
श्लोक –
यजमानः स्तंभाधोभागे वा द्वारशाखासु विन्यसेत् ।
स्थान: दानकर्त्याचे शिल्प सहसा मंदिराच्या प्रवेशद्वारावर किंवा स्तंभाच्या पायथ्याशी असावे.
अवस्था: तो गुडघे टेकलेल्या स्थितीत किंवा उभा राहून हात जोडलेल्या स्थितीत असावा.
दानकर्त्याच्या शिल्पाची सामान्य लक्षणे
विविध ग्रंथांतील सारांशानुसार, दानकर्त्याचे शिल्प खालीलप्रमाणे असावे:
मुद्रा : अंजली हस्त: दोन्ही हात जोडून प्रार्थना करण्याच्या स्थितीत.
पोशाख : अंगावर मोजकेच दागिने आणि साधे सोवळे असावे, जेणेकरून त्याचा नम्रपणा उठून दिसेल.
भाव : शांत, प्रसन्न आणि भक्तीपूर्ण
स्थान : गर्भगृहासमोर नसावे, तर मंदिराच्या प्रांगणात किंवा स्तंभावर असावे.
प्रमाण देवाच्या मूर्तीपेक्षा त्याचे आकारमान नेहमी कमी असावे.
सदर सर्व प्राचीन ग्रंथांचा आधार घेतल्यावर आपणास स्पष्ट खात्री पटते की,उत्तर – पूर्व स्तंभावरती पायथ्याला कोष्टकात अंकित केलेली मानवी मूर्ती ही गोंदेश्वर मंदिर बांधणाऱ्या व त्यासाठी धर्मदान करणाऱ्या गोविंदराजा यांची आहे.सदर शिल्प उजेडात आल्यामुळे सिन्नर नगरीच्या ऐतिहासिक , धार्मिक व सांस्कृतिक वैभवाला झळाळी प्राप्त झाली आहे.
इतके भव्य- दिव्य शैव पंचायतन मंदिर उभारणाऱ्या या धार्मिक व दानशूर गोविंदराजाचे शिल्प पाहिल्यानंतर निश्चितच आपल्या मनात सदर शिल्पाबद्दल व भव्य असे पंचायतन गोंदेश्वर मंदिर बांधणाऱ्या भक्त गोविंदराज यांच्या बद्दल आत्मियता व आदरभाव उत्पन्न झाल्याशिवाय राहत नाही.

– प्रा.जावेद शेख यांचे शिवचरित्र प्रकाशित असून ,त्रिंगलवाडी किल्ल्यावरती व गोंदेश्वर मंदिरावरती संशोधनाचे काम सुरु आहे.गोंदेश्वर मंदिरावरती त्यांचे गोंदेश्वर मंदिर दर्शन हे पुस्तक गुढी पाडव्याच्या प्रसंगी प्रकाशित होणार आहे.सदर पुस्तकात अशीच बहुमूल्य धार्मिक, ऐतिहासिक व स्थापत्यदृष्ट्या महत्वाच्या गोष्टींचा मागोवा घेण्यात आलेला आहे.
