
नांदगाव (प्रतिनिधी) – पिंपरखेड येथील टोल नाक्यावर कामगारांच्या न्यायहक्कांसाठी शिवसेना व कामगार विकास सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनानंतर टोल नाका तात्पुरता बंद करण्यात आला असून मागण्या पूर्ण होईपर्यंत टोल सुरू होणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे.

हे आंदोलन सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. महाराष्ट्र औद्योगिक कामगार विकास सेना च्या कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन उभारण्यात आले.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख फरहान दादा खान, कामगार विकास सेना अध्यक्ष सुनील जाधव तसेच शिवसेना शहरप्रमुख सुनील जाधव यांच्या नेतृत्वाखाली टोल व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला.

प्रमुख मागण्या :
कर्मचाऱ्यांचे तुटपुंजे वेतन तात्काळ वाढवावे
प्रलंबित वेतनवाढ लागू करावी
राष्ट्रीय महामार्गावरील वाढलेले खड्डे तातडीने दुरुस्त करावेत
बंद असलेले पथदीप त्वरित सुरू करावेत
आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले की, अनेक वेळा लेखी व तोंडी मागणी करूनही टोल प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे कामगारांच्या हक्कासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला.
मागण्या पूर्ण झाल्याशिवाय टोल नाका बंदच राहील, असा ठाम इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
