
मांडवड (प्रतिनिधी):नांदगाव शहरातील नामांकित शैक्षणिक संस्था मराठा विद्या प्रसारक संस्थेचे होरायझन अकॅडमी नांदगाव शाळेत आज विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाविन्यपूर्ण प्रयोगांनी आणि आकर्षक प्रकल्पांनी उपस्थितांची मने जिंकली.

या विज्ञान प्रदर्शनात इयत्ता पहिली ते सहावी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या प्रसंगी सौरऊर्जा प्रकल्प, पाणी शुद्धीकरण यंत्रणा, स्मार्ट सिटी मॉडेल, पर्यावरण संवर्धन, रोबोटिक्स, तसेच शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान यांसारख्या विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रभावी सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला उपस्थित पालक, शिक्षक व मान्यवरांनी दाद दिली. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे जेष्ठ सभासद अशोक शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. रामनाथ गायकवाड भावेश पाटील, डॉ. गणेश चव्हाण, राजू पाटील, उल्हास आहेर, शाळेच्या प्राचार्या श्रीमती. पूनम मढे हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.

शाळेच्या प्राचार्या आपल्या मनोगतात सांगितले की, “विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित व्हावा आणि त्यांची सर्जनशीलता वाढावी या उद्देशाने या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.” त्यांनी सर्व शिक्षकांचे आणि पालकांचे सहकार्याबद्दल आभार मानले.
विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी पालक व नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. प्रत्येक प्रकल्पासमोर विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने माहिती देत प्रात्यक्षिके सादर केली. परीक्षकांनी उत्कृष्ट प्रकल्पांची निवड करून विजेत्यांना पारितोषिके प्रदान केली.
एकूणच, होरायझन अकॅडमी नांदगाव येथील विज्ञान प्रदर्शनाने विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला नवी दिशा देत नांदगावात वैज्ञानिक विचारांची ज्योत प्रज्वलित केली आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयीची आवड अधिक दृढ झाली असून, भविष्यातही अशा उपक्रमांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या कार्यक्रसाचे नियोजन शालेय शिक्षिका पल्लवी दौंड, वैष्णवी बिडगर, स्वप्ना वाघ, अश्विनी वाघ यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शालेय शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
