
सोनांबे (. वसंत गोसावी, सिन्नर प्रतिनिधी ) येथील मधुकर शिंदे यांचा सुपुत्र सिद्धांत आणि जारकरवाडी (ता. आंबेगाव) येथील भगवान बढेकर यांची कन्या अक्षदा यांचा विवाह सोहळा पारंपरिक वारकरी संस्कृतीचा अनोखा ठसा उमटवत आगळावेगळा ठरला.
आजकाल विवाह समारंभांमध्ये डीजेच्या कर्णकर्कश आवाजाची चलती असताना शिंदे व बढेकर परिवाराने डीजेला फाटा देत टाळ–मृदंगाच्या गजरात सर्व विधी पार पाडण्याचा आदर्श घालून दिला.आळंदी येथील विष्णू महाराज आरगडे यांच्या ‘मृदंगनाथ वारकरी शिक्षण संस्थे’तील ३५ बाल वारकऱ्यांनी विवाह सोहळ्यात भजनी ठेका धरत वातावरण अक्षरशः भक्तिमय केले. साखरपुडा, नवरदेवाची मिरवणूक तसेच मंडपातील स्वागत सोहळा टाळ–मृदंगाच्या गजरात पार पडला. नवरदेव नवरीने हाती विठ्ठल–रुक्मिणी यांच्या मूर्ती घेत आगमन केले. “विठ्ठल माझा माझा, मी विठ्ठलाचा…” या गजराने उपस्थितांना वारकरी संप्रदायाची अनुभूती दिली. सध्याच्या राजकीय सभा व लग्न मिरवणुकांमध्ये डीजेचा मोठा वापर होत असताना त्याचा त्रास आजारी व्यक्ती, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना होतो. तसेच सध्या विद्यार्थ्यांचा परीक्षा कालावधी आहे. या पार्श्वभूमीवर पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देत साधेपणा आणि संस्कृती जपण्याचा संदेश या विवाहातून देण्यात आला. अवसरी बुद्रुक येथील यशोदिप मंगल कार्यालयात हा विवाह सोहळा संपन्न झाला. बढेकर (जारकरवाडी, ता. आंबेगाव) व शिंदे (सोनांबे, ता. सिन्नर) हे दोन्ही परिवार सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असून दोघांची आध्यात्मिक व सांप्रदायिक पार्श्वभूमी विशेष आहे. विशेष म्हणजे अक्षदा व सिद्धांत हे दोघेही उच्चशिक्षित आहेत. या सोहळ्यास माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, विष्णू महाराज केंद्रे, भीमाशंकर साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम, जिल्हा परिषद सदस्य विवेक वळसे पाटील, पंचायत समिती सदस्य अंकिता वाळुंज आदी मान्यवर उपस्थित होते.
भक्ती, परंपरा आणि सामाजिक जाणीव यांचा सुंदर संगम साधणारा हा विवाह सोहळा परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे
