
वसंत गोसावी, सिन्नर प्रतिनिधी : सिन्नर तालुक्यातील ज्येष्ठ निवृत्त कलाशिक्षक उदय देवनपल्ली यांचा आमदार ॲड. माणिकराव कोकाटे यांचे हस्ते विशेष सन्मान झाला. उदय देवनपल्ली यांनी महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच आमदार कोकाटे साहेब यांचे वॉटर कलरमधील देखणे पोर्ट्रेट सादर केले. पोर्ट्रेटची बारकाई, रंगसंगती आणि भावस्पर्शी मांडणी पाहून आमदार कोकाटे साहेबांनी समाधान व्यक्त करत देवनपल्ली सरांच्या कलागुणांचे मनापासून कौतुक केले. “कला ही समाजाला जोडणारी शक्ती आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले. यावेळी सिन्नर नगरपालिकेचे नगरसेवक पंकज जाधव, आनंद सालमुठे, सौ. अनुराधा देवनपल्ली आदी मान्यवर उपस्थित होते.

उदय देवनपल्ली हे बारागाव पिंपरी न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज विद्यालयातून उपप्राचार्य पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. शिक्षकी पेशासोबत त्यांनी जोपासलेला कलेचा छंद सेवा निवृत्तीनंतर अधिक जोमाने पुढे नेला. विशेषतः वॉटर कलर पोर्ट्रेट तयार करण्यात त्यांचा हातखंडा असून त्यांच्या चित्रांत व्यक्तीचे भाव, व्यक्तिमत्त्व आणि जिवंतपणा प्रभावीपणे उमटतो. आई-वडील, भाऊ-बहीण, जीवनसाथी किंवा खास व्यक्तींसाठी पोर्ट्रेट ही एक आगळीवेगळी भेट ठरू शकते. आयुष्यभर जपता येईल अशी सुंदर आठवण देवनपल्ली सर आपल्या कुंचल्यातून साकारतात. त्यामुळे त्यांच्या कलेला सिन्नर तालुक्यातून मोठी मागणी मिळत आहे.
सिन्नर तालुक्यातील गुणी कलाकाराचा सन्मान होत असल्याने नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे. देवनपल्ली सरांची कला भविष्यातही अनेकांच्या आयुष्यात आनंद आणि आठवणींची रंगत भरत राहो, अशीच अपेक्षा व्यक्त होत आहे.
