
सिन्नर (वसंत गोसावी, सिन्नर प्रतिनिधी) : कुंदेवाडी (ता.सिन्नर) येथील श्री ह.भ.प. भागवताचार्य एकनाथ महाराज गोळेसर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त समस्त नाशिक जिल्ह्याच्या वतीने आयोजित पहिली नियोजन बैठक नुकतीच झाली. सिन्नर येथील अहिल्याबाई होळकर वारकरी भवन येथे ही बैठक झाली. या बैठकीस नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे, जगद्गुरु द्वाराचार्य रामकृष्णदासजी महाराज लहवितकर, कमलाकर पोटे, भाजप नेते बंडू नाना बाबड, महिंद्रा शोरूमचे संचालक प्रभाकर गोळेसर, श्री संत निवृत्तीनाथ महाराज देवस्थानच्या माजी विश्वस्त सौ.सुमनताई खुळे, रामभाऊ लोणारे, उमंग फाऊंडेशनचे नानासाहेब सानप, हिरामण शिंदे, सोपान महाराज गोळेसर आदींसह राजकीय, धार्मिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सुमारे दोन तास चाललेल्या बैठकीत अमृत महोत्सवाचे स्वरूप, कार्यक्रम भव्य आणि संस्मरणीय करण्याचे नियोजन यावर चर्चा झाली. वारकरी परंपरेला साजेसे सर्वसमावेशक कार्यक्रम पत्रिका यावेळी निश्चित केली.

खासदार राजाभाऊ वाजे यांनी माहिती देताना सांगितले की, श्री एकनाथ महाराज गोळेसर बाबांचा अमृत महोत्सव 20 ते 23 एप्रिल 2026 दरम्यान साजरा करण्यात येणार आहे. या चार दिवसीय सोहळ्यात दोन सत्रांमध्ये महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांचे कीर्तन , गाथा-भजन,
भव्य अन्नदान, संत परंपरेचे दर्शन घडविणारे सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

हा अमृत महोत्सव केवळ सिन्नर तालुक्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण नाशिक जिल्ह्यासाठी एक आध्यात्मिक पर्व ठरणार असून वारकरी संप्रदायाच्या भक्तांसाठी ही मोठी पर्वणी असणार आहे. आयोजन समितीच्या वतीने सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. श्री एकनाथ महाराज गोळेसर बाबांचा अमृत महोत्सव भक्तिभाव, सेवा आणि एकात्मतेचा अद्वितीय सोहळा ठरणार आहे.
