
भालूर (वार्ताहर) गावाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये गावाने सक्रीय सहभाग घेतला पाहिजे. गावातील प्रत्येक नागरिकाने या अभियानासाठी आपले योगदान दिले तर निश्चितच गावाचे भवितव्य उज्वल होऊ शकते. भालूर गावाने लोकसहभागातून साकारलेली छत्रपती शिवाजी महाराज अभ्यासिका त्याचेच एक उदाहरण असून हाच आदर्श इतरांनी घेण्याची गरज आहे असे प्रतिपादन ह.भ.प. संजय महाराज पाचपोर यांनी केले.
भालूर येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत १३ लाख रुपये खर्च करून छत्रपती शिवाजी महाराज अभ्यासिका सुरु केली. या अभ्यासिकेचे उद्घाटन ह.भ.प. संजय महाराज पाचपोर यांनी केले त्यावेळी ते बोलत होते. गावाचा विकास साधायचा असेल तर प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्वाचा असून त्यासाठी गावाने एकत्रित येण्याची गरज असते.
मोबाईल मधून केलेला अभ्यास लक्षात राहत नाही परंतु पुस्तकातून केलेले वाचन नक्कीच लक्षात राहते.आणि म्हणूनच भालुरकर अभिनंदनास पात्र असून त्यांनी तरुणांसाठी सुसज्ज अभ्यासिका लोकसहभागातून सुरू केली.गावाने असाच लोकसहभाग वाढवला तर मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत गावाला नक्कीच बक्षिस मिळू शकते असे प्रतिपादन केले.यावेळी ह. भ. प. तुकाराम महाराज जेऊरकर,माजी आमदार संजय पवार, सरपंच शालुबाई थेटे, दिगंबर निकम,गणपत निकम,रमेश निकम,माधव निकम,राजेश निकम,राजेंद्र मेंगळ, नंदू इल्हे, देविदास निकम,विठ्ठल सोमासे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुस्तकांसाठी सरसावले दातृत्वांचे हात
छत्रपती शिवाजी महाराज अभ्यासिकेसाठी गावातील जे नागरिक नोकरी निमित्त बाहेर आहेत अशा अनेकांनी या अभ्यासिकेसाठी पुस्तके भेट दिली, त्यांचेही ग्रामपंचायतीकडून यावेळी आभार व्यक्त करण्यात आले.
