
नांदगाव (प्रतिनिधी) कासारी जवळील चांदेश्वरी घाटात सोमवारी रात्री मका घेऊन जाणारा ट्रक अवघड उतारावरून चालकाचा ताबा सुटल्याने पुढे कापूस माल घेऊन जाणाऱ्या ट्रकला धडकला व त्यानंतर संरक्षण भिंतीला धडक देत सुमारे 30 फूट खोल दरीत जाऊन कोसळला या अपघातात दोन्ही ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही .मात्र वाहतूक मार्ग काही काळ बंद होता.

चांदेश्वरी घाट उतरताना बोलठाण कडून जाणारा ट्रक ( क्र. एम.एच.४१ ए.जी.८६५३) नांदगावकडे मका घेऊन जात असताना उतारावरून ट्रक वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक पुढे चालत असलेल्या कापसाने भरलेल्या ट्रक ( क्र.एम.एच.२० जी.सी. ७३२९) या वाहनास धडकला. या धडकेनंतर सदर वाहन संरक्षण भिंतीला धडकून तीस फूट खोल दरीत कोसळला तर दुसरा ट्रक रस्त्यावर उलटल्याने सदर रस्ता वाहतुकीसाठी काही काळ बंद झाला दिवसभर अनेक वाहनांची तारांबळ उडाली अनेक वाहनांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागला ऐन अवघड वळणावर अपघात झाल्याने, एका अपघातग्रस्त मालवाहतूक ट्रक मागे आणखीन काही अवघड वाहने अडकून पडली आहे.
