
नासाका विद्यालयात अधिकारी पदांवर निवड झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांसह पूजा डुंबरे, शुभम गाडेकर, सार्थक पानसरे, शरद मुठाळ मुख्याध्यापक अरुण पगार आदींसह शिक्षक आणि कर्मचारी.
नाशिकरोड:- (प्रतिनिधी ) संघर्ष आणि सहनशीलतेची प्रेरणा घेऊन आपण प्राप्त केलेले यश हे निश्चितच प्रेरणादायी असते. ज्या क्षेत्रात आपली निवड झाली; त्या ठिकाणी प्रामाणिकपणे सेवा करणे, हीच खरी देशसेवा आहे, असे प्रतिपादन नासाका विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण पगार यांनी केले. पळसे येथील नासाका कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयात विविध पदांवर नियुक्त झालेल्या माजी विद्यार्थी सन्मान सोहळ्यात सन्मान सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. मंचावर सन्मानार्थी विद्यार्थ्यांसह पूजा डुंबरे, शुभम गाडेकर, सार्थक पानसरे, शरद मुठाळ आदींसह शिक्षक-कर्मचारी उपस्थित होते. माजी विद्यार्थी आणि विविध पदांवर निवड झालेल्या सूरज डुंबरे (भारतीय सैन्यदल), जयश्री मुठाळ (मुंबई शहर पोलीस), मनकर्णिका काळे (मुंबई पोलीस) यांचा सन्मानचिन्ह आणि ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला. सत्कारार्थी गुणवंतांनी यशासाठी खडतर परिश्रम आवश्यक असतात. कधी आलेल्या अपयशाने खचून न जाता सतत प्रयत्न करावे लागतात; तेव्हा यश मिळतं. शालेय वयात मंचासमोर बसून सन्मानसोहळा पाहणं आणि मंचावर येऊन सन्मान स्वीकारण्याचा प्रवास हा अतिशय खडतर असतो. कुटुंब, शाळा यांच्यासह यशासाठी स्वतःचे प्रयत्न अत्यावश्यक असतात, असे सांगितले. सांस्कृतिक विभाग प्रमुख कैलास लहांगे यांनी आभार मानले तर शिक्षक रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन केले.
