
ठाणे (गुरुदत्त वाकदेकर) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा गुरुवार, दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी इंग्रजी दिनदर्शिकेनुसार जन्मोत्सव मराठा मंडळ, ठाणे यांच्या वतीने अत्यंत उत्साहात, शिस्तबद्ध पद्धतीने आणि भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

सकाळी ८.०० वाजता मासुंदा तलाव येथील महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास मंडळाच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर हरिनिवास सर्कल येथील छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवनातील सिंहासनारूढ पुतळ्याचे विधिवत पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

सायंकाळी ५.३० वाजता आयोजित मुख्य कार्यक्रमात विविध सांस्कृतिक उपक्रम सादर करण्यात आले. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडू प्रकाशिका प्रकाश नाईक हिला ‘मराठा समाज गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. इतिहास संशोधक व लेखक अप्पा परब आणि सुप्रसिद्ध कवी व साहित्यिक प्रा. अशोक बागवे यांना ‘मराठा समाज भूषण पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.

कार्यक्रमात कथ्थक नृत्य आणि अभंग यांचे सुरेख फ्युजन, लोकगीते तसेच ‘शिवबाचा पाळणा’ सादर करण्यात आला. श्रीमुद्रा कलानिकेतन आणि लीना भोसले यांच्या रिदम अकादमीच्या कलाकारांनी सादर केलेल्या नृत्याविष्काराने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यशवंत कालेकर, अर्जुनी सास्ते तसेच नैनिशा व नियना काळे यांनी गायन व नृत्य सादर केले. अर्जुनी सास्ते हिची खणखणीत ललकारी विशेष आकर्षण ठरली.
या उत्सवानिमित्त गुरुवार, दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी विद्यार्थ्यांसाठी महाराजांच्या रेखाचित्रांवर रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिके, सन्मानचिन्हे आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. अर्चना देशपांडे-जोशी, राजन तावडे आणि डॉ. मीनल दुखंडे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
या कार्यक्रमास ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर कृष्णाजी पाटील, नवनिर्वाचित नगरसेवक संजय वाघुले, प्रतिभा मढवी, मृणाल पेंडसे आणि संजय बारटक्के उपस्थित होते. मान्यवरांच्या प्रेरणादायी मनोगतांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाची सांगता ‘वंदेमातरम्’ गीताने आणि सहभोजनाने करण्यात आली.
