
नाशिक (प्रतिनिधी): जगणं आणि जगण्याची मूल्ये जाणणारे अभिजात साहित्य ग्रामीण भोवतालातून अधिक प्रभावीपणे उमटते, असे प्रतिपादन नाटककार दत्ता पाटील यांनी केले. २६ व्या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. नातेसंबंध आणि त्यांतील गुंतागुंतीचे पदर अधिक प्रभावीपणे गुंफण्याची ताकद ग्रामीण साहित्यामध्ये असते, असे त्यांनी नमूद केले.

या वेळी व्यासपीठावर माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, ज्येष्ठ साहित्यिक पुंजाजी मालुंजकर, ज्येष्ठ साहित्यिक अलका दराडे, वैजयंती सिन्नरकर, चंद्रकांत खाडे, सुभाष सबनीस, प्रमोद ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
दत्ता पाटील पुढे म्हणाले की, ग्रामीण आणि शहरी साहित्य असा भेदभाव मान्य नाही. साहित्य हे जीवनमूल्ये शिकवणारे असते; त्यात ग्रामीण-शहरी असा कुठलाही भेदभाव नसतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संमेलनाची सुरुवात शाहीर उत्तम गायकर यांनी सादर केलेल्या महाराष्ट्र गीताने झाली. संमेलनाचे उद्घाटन अलका दराडे यांच्या हस्ते झाले. मालकंस भट यांनी स्वागतगीत सादर केले. ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद ठाकरे यांनी स्वागत केले, तर प्रास्ताविक पुंजाजी मालुंजकर यांनी केले.
पुरस्कारांचे वितरण
यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
सर्वतीर्थ पुरस्कार: प्रा. गिरीश पाटील
जीवनगौरव पुरस्कार: तुकाराम ढिकले
ज्ञानदूत पुरस्कार: प्रा. राज शेळके
ज्ञानसाधना पुरस्कार: रामचंद्र शिंदे
कलारत्न पुरस्कार: दिनेश चव्हाण
काव्यरत्न पुरस्कार: प्र. द. कुलकर्णी
अक्षरदूत पुरस्कार: आरती डिंगोरे
दारणा गौरव पुरस्कार: रतन संचेती
सामाजिक कृतज्ञता पुरस्कार: डॉ. हनुमंत बांगर, अनिता बांगर
साहित्य सेवा पुरस्कार: सुहास टिपरे
परिसंवाद व कथाकथन
द्वितीय सत्रात “वाचन चळवळ समृद्ध करण्यासाठी कोणते उपाय?” या विषयावर परिसंवाद झाला. यात प्रा. राज शेळके, सप्तर्षी माळी, प्रा. हेमंत चोपडे, पुंजाजी मालुंजकर, दत्ता पाटील आणि अलका दराडे यांनी सहभाग घेतला. त्यानंतर उत्कृष्ट वाड्मयीन पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
तृतीय सत्रात कथाकथन कार्यक्रम झाला. यात दत्तात्रेय झनकर, अलका कोठावदे, संदीप देशपांडे, तुकाराम धांडे यांनी सहभाग घेतला. खुले काव्यसंमेलनात अनेक कवींनी सहभाग नोंदवत कार्यक्रमात रंगत आणली.
उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन रवींद्र मालुंजकर व ॲड. ज्ञानेश्वर गुळवे यांनी केले, तर आभार प्रदर्शन ग्रंथमित्र बाळासाहेब पलटने यांनी केले. जिल्हाभरातून साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पसायदान पठणाने कार्यक्रमाची सांगता झाली.
