
सोनांबे (प्रतिनिधी ) : येथील गुणवंत विद्यार्थी चि. हर्ष रमेश पवार याने भारतीय कौशल्य स्पर्धा अंतर्गत थ्री डी ॲनिमेशन गेमिंग प्रकारात पश्चिम भारतातून सुवर्णपदक पटकावत गावाचे नाव उंचावले आहे. त्याच्या या अभूतपूर्व यशाबद्दल गावातील गोवर्धन पतसंस्था, सोनांबे सोसायटीच्या वतीने भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी गोवर्धन पतसंस्थेचे अध्यक्ष शरद रत्नाकर होते. यावेळी सरपंच सौ. प्रमिला पवार, उद्योजक तानाजी पवार, पतसंस्थेचे व्हा. चेअरमन भाऊसाहेब पवार, निवृत्त पोलीस अधिकारी पांडुरंग पवार, दिपक वारुंगसे, अनिल पवार, संतोष डावरे, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन पंडित घोडे, सुरेश पवार, ज्ञानेश्वर बोडके, रामभारती गोसावी, रमेश पवार, पतसंस्थेचे व्यवस्थापक संदीप घोडे, रामदास बोडके आदी मान्यवर उपस्थित होते.

. केंद्रीय कौशल्य विकास विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या इंडिया स्किल्स 2025–2026 अंतर्गत गांधीनगर, गुजरात येथे प्रादेशिक पश्चिम विभागीय स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत देशातील 63 विविध कौशल्य प्रकारांचा समावेश होता. थ्री डी ॲनिमेशन गेमिंग या अत्यंत स्पर्धात्मक प्रकारात महाराष्ट्र राज्याचा प्रतिनिधी म्हणून हर्षने सहभाग घेतला.गांधीनगर गुजरात येथे पार पडलेल्या या स्पर्धेत पाच राज्यांतील प्रतिभावान स्पर्धकांमध्ये हर्षने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आणि सुवर्णपदकाचा मान मिळवला. त्याच्या या यशामुळे आता त्याची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. हर्षला नाशिक येथील एरिना ॲनिमेशन अकॅडमीचे प्राचार्य अभिजीत नेवे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या योग्य दिशादर्शनामुळेच हर्षला हे यश संपादन करता आले. वसंत गोसावी यांनी सुत्रसंचलन केले तर अनिल पवार यांनी आभार मानले. गावातील युवकांसाठी हर्षचे यश प्रेरणादायी ठरत असून, तंत्रज्ञान आणि कौशल्य क्षेत्रात ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील राष्ट्रीय पातळीवर झळकू शकतात याचा प्रत्यय या यशातून आला आहे. सोनांबे गावाने आपल्या सुपुत्राचा केलेला सन्मान हा खऱ्या अर्थाने प्रतिभेचा गौरव ठरला.

