
सोनांबे ( वसंत गोसावी प्रतिनिधी ): येथील शिवस्मारकावर श्री शिवनिश्चल योगभारती फाउंडेशन तर्फे तीन नद्यांच्या जलाने अभिषेक करण्यात आला. शिवजन्मोत्सव सोहळा सांगता निमित्ताने हा कार्यक्रम झाला.

यावेळी वाराणसी, ओंकारेश्वर व अयोध्या येथून आणलेल्या तीन पवित्र नद्यांचे जलपूजन गोवर्धन पतसंस्थेचे चेअरमन शरद रत्नाकर, उद्योजक तानाजी पवार, दिपक वारूंगसे यांचे हस्ते करण्यात आले. यानंतर येथे नव्याने उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकावर श्रीक्षेत्र वाराणसी काशी येथील पवित्र गंगाजलाचा अभिषेक श्री शिवनिश्चल योगभारती फाऊंडेशनचे अध्यक्ष रामभारती गोसावी व विकास सोसायटीचे संचालक ज्ञानेश्वर बोडके यांच्या हस्ते झाला. श्री क्षेत्र ओंकारेश्वर येथील पवित्र नर्मदा जलाचा अभिषेक शिवनिश्चल फाऊंडेशनचे संचालक विष्णू डगळे व गोवर्धन पतसंस्थेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब पवार यांच्या हस्ते झाला. श्रीक्षेत्र अयोध्या येथील शरयू पवित्र गंगाजलाचा अभिषेक सामाजिक कार्यकर्ते रमेश पवार व रामदास बोडके यांच्या हस्ते झाला. यावेळी फाऊंडेशनचे सचिव वसंत गोसावी यांनी शंखनाद करत शिवषडाक्षर स्तोत्र, द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र तसेच शिवमानस पूजेचे पठण केले. शिवस्मारकाचे पूजन सोनांबेच्या सरपंच सौ. प्रमिला पवार व अनिल पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी अनिल पवार, सुरेश पवार, निवृत्ती बोडके, संदीप घोडे , हरिश्चंद्र सातपुते, प्रवीण पवार यांचेसह शिवस्मारक समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फाउंडेशनचे श्रीकांत गोसावी , अनिता गोसावी, जयश्री गोसावी, सुनिता गोसावी, बाळनाथ गोसावी, प्रशांत गोसावी यांनी संयोजन केले. तीन पवित्र नद्यांच्या जलाचा अभिषेक, शंखनाद व मंत्रोच्चार यामुळे वातावरण भक्तीमय झाले होते. शांतीपाठाने कार्यक्रमाचा समारोप झाला. फाऊंडेशन योगाच्या माध्यमातून समाजातील लोकांच्या आरोग्यासाठी निःशुल्क योगवर्ग चालवते. त्याचबरोबर महापुरूषांच्या विचारांचे जतन, प्रचार प्रसार व संगोपनासाठी संस्थेचा हा उपक्रम आयोजित केल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

