
नाशिक. (प्रतिनिधी):- इगतपुरी तालुका साहित्य मंडळ आयोजित २६ वे ग्रामीण साहित्य संमेलन आज (२२) नाशिक येथील ग्रामसेवक भवन, तिडके कॉलनी या ठिकाणी आयोजित करण्यात आले असून तीन सत्रात हे साहित्य संमेलन पार पडणार आहे.
दरवर्षी आयोजन करण्यात येत असलेल्या या साहित्य संमेलनाची साहित्यिक आणि साहित्य प्रेमी मोठ्या उत्सुकतेने वाट बघत असतात.
संमेलनाध्यक्ष म्हणून प्रसिद्ध नाटककार दत्ता पाटील हे असणार आहेत तर उद्घाटक प्रा.सुमती पवार यांचे हस्ते संमेलनाची सुरुवात होणार आहे. स्वागताध्यक्ष कैलास वाकचौरे मान्यवरांचे स्वागत करतील.
प्रथम सत्रात सकाळी नऊ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम,सकाळी १० ते १२ वाजता संमेलनाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. १२ वाजेनंतर पुरस्कार वितरण होईल.त्यानंतर स्नेहभोजन होईल दुपारी १.३० वाजता द्वितीय सत्रात उत्कृष वाड्मयीन पुरस्कार वितरण होईल.२ वाजता वाचन संस्कृती समृद्ध करण्यासाठी कोणते उपाय? या विषयावर परिसंवाद होईल. तृतीय सत्रात ३ ते ५.३० या दरम्यान मान्यवर लेखकांचे कथाकथन आणि उपस्थित कवींचे खुले काव्य संमेलन होईल.
त्यानंतर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता होईल. दरवर्षी भरणाऱ्या या साहित्य मेळ्यासाठी राज्यभरातून साहित्यिक,साहित्य प्रेमी उपस्थित राहत असतात. त्यासाठी इगतपुरी तालुका साहित्य मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक पुंजाजी मालुंजकर, बाळासाहेब पलटने, ॲड.ज्ञानेश्वर गुळवे, ॲड.रतनकुमार इचम, रवींद्र पाटील, दत्तात्रय झनकर, हिरामण शिंदे, सुदर्शन पाटील आदी कार्य करत आहे.
