
सोनांबे (ता. सिन्नर) येथील गुणवंत विद्यार्थी चि. हर्ष रमेश पवार याने पुन्हा एकदा आपल्या कर्तृत्वाची सुवर्णमुद्रा उमटवत भारतीय कौशल्य स्पर्धा अंतर्गत त्रिमितीय खेळकला प्रकारात पश्चिम भारताचा सुवर्णपदक विजेता होण्याचा मान मिळवला आहे. केंद्रीय कौशल्य विकास विभागाचे वतीने आयोजित इंडिया स्किल्स २०२५–२०२६ अंतर्गत प्रादेशिक पश्चिम विभाग स्पर्धा गांधीनगर येथे उत्साहात पार पडली. ६३ विविध कौशल्य प्रकारांपैकी त्रिमितीय डिजिटल खेळकला या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचा विजेता म्हणून सहभागी झालेल्या हर्षने प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक पटकावले.
पश्चिम विभागातील पाच राज्यांमधून आलेल्या स्पर्धकांमध्ये हर्षने सातत्यपूर्ण मेहनत, कल्पक विचारशक्ती आणि तांत्रिक कौशल्याच्या जोरावर अव्वल स्थान मिळवले. या दैदिप्यमान यशामुळे त्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड निश्चित झाली असून, आता संपूर्ण महाराष्ट्राच्या आशा त्याच्यावर केंद्रित झाल्या आहेत.शालेय जीवनापासून यशाचा ध्यास असलेल्या
हर्षने आपले शालेय शिक्षण गावातील जनता विद्यालयात पूर्ण केले. शालेय जीवनात तो अत्यंत बुद्धिमान, अभ्यासू व गुणवंत विद्यार्थी म्हणून ओळखला जात होता.
त्याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवून शिष्यवृत्ती संपादन केली होती. तसेच केंद्र शासनाच्या एन एम एम एस अंतर्गत परीक्षेतही गुणवत्ता यादीत उत्तीर्ण होत शिष्यवृत्ती मिळवली होती. दहावी मध्ये 86 तर बारावी विज्ञान मध्ये 65 टक्के गुण मिळवले होते. कला शाखेची पदवी घेत असतानाच त्याने नाशिक येथील एरिना ॲनिमेशन अकॅडमीत त्याने ॲनिमेशन व ग्राफिक डिझायनिंगचे शिक्षण घेतले. एलिमेंटरी व इंटरमिजीएट चित्रकला परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
साधी कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या हर्षची आई गृहिणी असून वडील विज्ञान शाखेचे पदवीधर आहेत. ते मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत कामगार म्हणून कार्यरत आहेत. अत्यंत साध्या कुटुंबातून आलेल्या हर्षने आपल्या जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या जोरावर राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक मिळवण्याची ऐतिहासिक कामगिरी करून सोनांबे गावासह सिन्नर तालुक्याचा नावलौकिक वाढवला आहे.राज्यस्तरावर अव्वल ठरल्यानंतर आता प्रादेशिक पातळीवर सुवर्णयश संपादन करत हर्षने खऱ्या अर्थाने “स्थानिक प्रतिभेपासून जागतिक व्यासपीठापर्यंत” असा प्रेरणादायी प्रवास साकार केला आहे.
संपूर्ण परिसरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, आगामी राष्ट्रीय स्पर्धेतही तो सुवर्ण कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

हर्ष पवार प्रतिक्रिया –
अॅनिमेशन व ग्राफिक डिझाईन म्हणजे बॉलिवुड, हॉलीवूड फिल्म, टेलिव्हिजन मालिका, कार्टून फिल्म, जाहिरात, शैक्षणिक आदी क्षेत्रात करिअरच्या नवीन संधी असल्याने तरूणांनी व्यावसायिक दृष्टिकोनातून या क्षेत्राकडे पहावे.
