
सोनांबे (वसंत गोसावी प्रतिनिधी ): येथील नव्याने उभारण्यात आलेल्या शिवसृष्टी परिसरात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारक जीर्णोद्धार व शिवजन्मोत्सव सोहळा चार दिवस अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला.
16 फेब्रुवारी पासून या उत्सवाला सुरुवात झाली पहिल्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विधिवत पूजा, अभिषेक व आरती करून कार्यक्रमाने शिवजन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ झाला.

शिवभक्तांच्या जयघोषात आणि ढोल-ताशांच्या गजरात स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यात आले. शिवाजी महाराजांच्या पराक्रम, न्यायनीती आणि लोककल्याणकारी राज्यकारभाराची आठवण यावेळी उपस्थितांनी भावपूर्ण शब्दांत व्यक्त केली. सायंकाळी युवा शिवव्याख्याते सुदर्शन शिंदे यांचे ‘शिवशंभू चरित्र’ या विषयावर शिवचरित्राचा प्रेरणादायी प्रवास मांडला. त्यांनी छत्रपतींच्या सामाजिक व राजकीय जीवनाचे विविध पैलू उलगडत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
व्याख्यानात त्यांनी खालील मुद्द्यांवर विशेष प्रकाश टाकला. स्वराज्यातील सामाजिक समतेचा संदेश, सर्वधर्मसमभाव, स्त्रीसन्मान आणि प्रजाहिताची पराकोटीची तळमळ आपल्या मनोगतात मांडली. महाराजांची राजकीय दूरदृष्टी, स्वराज्य स्थापनेतील रणनीती, गनिमी कावा आणि प्रशासन कौशल्य आपल्या ओघवत्या शैलीत मांडले. राजांची न्यायप्रियता व शिस्त , कठोरपणा लोकाभिमुख शासनपद्धती हे आजच्या प्रशासनासाठी व युवकांसाठी कसे प्रेरणादायी आहे हे त्यांनी पटवून दिले. महाराजांचे ध्येय, शौर्य आणि संघटनशक्तीचे महत्त्व आपल्या ओजस्वी भाषणातून मांडल्यामुळे तरुणांमध्ये राष्ट्राभिमान आणि स्वाभिमानाची भावना अधिक दृढ झाल्याचे दिसून आले. कार्यक्रमानंतर गोवर्धन पतसंस्थेच्या वतीने सर्व उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान या कार्यक्रमाला सिन्नरचे नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले, उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख आदी मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
17 फेब्रुवारी रोजी गाव व परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी शिवचरित्रकार नितिन महाराज भोसले कोपरगावकर यांचे शिवचरीत्रावर हरि किर्तन झाले. यानंतर देवनदी खोरे पतसंस्थेतर्फे महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.

19 फेब्रुवारी रोजी मुख्यदिवशी मिरवणूक सोहळ्याने सांगता झाली. दररोज सायंकाळी गावातील श्री संत निवृत्तीनाथ बाल प्रासादिक भजनी मंडळातर्फे हरिपाठ घेण्यात आला.
सोनांबे पंचक्रोशीतील शिवभक्तांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिवसृष्टीत उभारलेले हे स्मारक केवळ दगड-मातीचे नसून, ते स्वराज्याच्या विचारांचे आणि शिवशंभूंच्या सामाजिक-राजकीय आदर्शांचे जिवंत प्रतीक ठरत आहे. शिवाजी महाराज स्मारक जिर्णोद्धार समिती, सर्व ग्रामस्थ सोनांबे तसेच गावातील विविध संस्था, पदाधिकारी, देणगीदार यांच्या सहकार्याने हा सोहळा यशस्वी झाला.
