
विंचूर दि.१७ (प्रतिनिधी) येथील शनैश्वर महाराज अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता भव्य शोभायात्रेने करण्यात आली.महाशिवरात्री निमित्त येथील शनैश्वर तेली पंच कमिटी, संताजी युवा प्रतिष्ठान व विंचूरकर ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने श्री शनैश्वर महाराज मंदिरात दि.९ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.सप्ताहात दि.९ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत दररोज सायंकाळी ७ ते ९ या वेळेत महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांची किर्तनं आयोजित करण्यात आली होती.

तसेच नित्य रात्री ९:०० वा. महाप्रसाद वाटपाचे आयोजन करण्यात आले होते.तर दि. १६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत देवगड येथील ह.भ.प. शुभम महाराज कांडेकर यांचे काल्याचे किर्तन झाले.तद्नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी सवाद्य कावड यात्रा काढण्यात आली. व वाद्यांच्या गजरात शनैश्वर महाराजांच्या प्रतिमेची सजविलेल्या रथातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.यावेळी संताजी महिला मंडळाच्या महिला पिवळ्या रंगाच्या साड्या व पुरुष भगवी टोपी परिधान करून शोभायात्रेत सहभागी झाले होते.रामकृष्ण हरी चा गजर करीत शिस्तबद्ध काढलेली शोभायात्रा नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती. यावेळी शनैश्वर तेली पंच कमिटीचे पदाधिकारी, संताजी युवा प्रतिष्ठानचे सदस्य, विंचूरकर ग्रामस्थ आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
