
विंचूर (प्रतिनिधी) श्री शनैश्वर महाराज महाआरोग्य शिबिराची सांगता रक्तदान शिबिराने करण्यात आली. शनैश्वर तेली पंच कमिटी, संताजी युवा प्रतिष्ठान व विंचूरकर ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने महाशिवरात्री निमित्त येथील श्री शनैश्वर महाराज मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.सप्ताहात सामाजिक दायित्व म्हणून दि.९ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी या कालावधीत दररोज सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. महाआरोग्य शिबिर सांगता निमित्ताने सकाळच्या सत्रात लॅप्रोस्कोपिक अँड जनरल सर्जन डॉ गिरीश थोरात यांचे पोट विकार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डॉ थोरात यांच्या समवेत डॉ कल्पना थोरात, ऋषिकेश नेवगे यांनी ४२ रुग्णांची पोट विकारा संबधी तपासणी केली. तसेच दुपारच्या सत्रात आयोजित रक्तदान शिबिरात ३० रक्तदात्यांनी रक्तदान करुन आपले राष्ट्रीय दायित्व पार पाडले. सिन्नर येथील साईनाथ रक्तपेढीच्या सहाय्याने आयोजित रक्तदान शिबिरात डॉ.सपना नवले, किशोर साळूंके यांचे सहकार्य लाभले. महाआरोग्य शिबिराच्या यशस्वितेसाठी संताजी युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते, शनैश्वर तेली पंच कमिटी तसेच विंचूरकर ग्रामस्थ प्रयत्नशील होते.
