
नाशिक (प्रतिनिधी). नाशिक मधून प्रकाशित होणाऱ्या ‘सुभाषित’ या विनोदी दिवाळी अंकाला उत्कृष्ट विनोदी दिवाळी अंक म्हणून फलटण येथील ॲग्रोन्यूज परिवार चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने दिला जाणारा छत्रपती संभाजी महाराज साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. २७ फेब्रुवारी मराठी भाषादिनी हा छत्रपती संभाजी महाराज साहित्य पुरस्कार प्रदान केला जाणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश सस्ते आणि परीक्षक प्रा. विजय काकडे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

सुभाषितला या वर्षात अक्षरबंध प्रतिष्ठान, नाशिक, उल्हासप्रभात,ठाणे या पुरस्कारानंतर मिळालेला हा सलग तिसरा पुरस्कार आहे. गेली पंधरा वर्ष सुभाषित विनोदी दिवाळी अंक नाशिक येथून प्रकाशित होत असून नवोदित तसेच जुन्या जाणत्या विनोदी लेखकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सुभाषित दिवाळी अंक गेली सातत्याने प्रयत्न करत आहे. पंधरा वर्षांमध्ये तिसावा पुरस्कार मिळालेला नाशिक मधील हा महत्त्वाचा दिवाळी अंक आहे.
सुभाषितच्या या यशाबद्दल संपादक सुभाष सबनीस यांचे नाशिक कवीचे अध्यक्ष बाळासाहेब मगर, भोसलाचे कार्याध्यक्ष ॲड.अविनाश भिडे, प्रकाशक संघाचे अध्यक्ष विलास पोतदार, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, साहित्यिक विवेक उगलमुगले,रवींद्र मालुंजकर, संदीप देशपांडे यांनी अभिनंदन केले आहे.
