
पुणे (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा आणि सर्वोच्च समजला जाणारा ‘मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार’ यंदा विनोद कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी दिलेल्या लक्षणीय आणि सातत्यपूर्ण योगदानाची दखल घेत निवड समितीने त्यांची निवड केल्याचे शासनाच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. हा सन्मान मिळाल्याने “कार्याचे सार्थक झाले” अशी भावना कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
मराठी भाषा चळवळीतील १५ वर्षांची सातत्यपूर्ण धडपड
सुमारे १५ वर्षांपूर्वी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेची स्थापना करून कुलकर्णी यांनी मराठी भाषा चळवळीला नवी दिशा दिली. शाहूपुरी शाखा स्थापन झाल्यानंतर राज्यातील पहिला ‘मराठी भाषा पंधरवडा’ सुरू करण्याचा मान त्यांच्या पुढाकारामुळे मिळाला. सलग १४ वर्षे हा उपक्रम राबवून मराठी भाषा दिन साजरा करण्याची व्यापक चळवळ उभी केली.
साहित्याच्या व्यासपीठावरून सामाजिक कार्याला देणगी देण्याचा पायंडा त्यांनी पाडला. मा. प्रकाश आमटे आणि डॉ. रविंद्र कोल्हे यांच्या कार्याला हातभार लावला.
अभिजात भाषेच्या दर्जासाठी लढा
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मा. नरेंद्र मोदी यांना सातारा जिल्ह्यातून एक लाख पत्रे पाठविण्याचा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. तसेच दिल्ली येथे धरणे आंदोलन करून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. अमळनेर येथे झालेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अभिरूप न्यायालयात मराठी जनतेच्या वतीने प्रभावी बाजू मांडली.
साहित्य संवर्धन आणि स्मारक उभारणी
युगप्रवर्तक कवी बा. सी. मर्ढेकर यांच्या पडझड झालेल्या घराचे नूतनीकरण करून त्याचे स्मारकात रूपांतर करण्याचे कार्यही कुलकर्णी यांच्या पुढाकारातून पार पडले. तसेच सातारा जिल्ह्यातील साहित्यिकांचे त्यांच्या जन्मभूमीत व कर्मभूमीत पुतळे उभारण्याचे काम सुरू आहे.
‘छोट्या बॅकेची मोठी गोष्ट’ हे पुस्तक त्यांनी लिहिले असून कवी बा.सी. मर्ढेकर यांचे चरित्रही प्रकाशनाच्या मार्गावर आहे.
साहित्य संमेलनातील घटनादुरुस्तीचा पुढाकार
साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद निवडणुकीऐवजी सन्मानाने मिळावे यासाठी अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या घटनादुरुस्तीसाठी त्यांनी पुढाकार घेतला. ही दुरुस्ती अमलात आल्यानंतर अनेक मातब्बर लेखकांना सन्मानाने अध्यक्षपद मिळाले.
तसेच साताऱ्यात तब्बल ३२ वर्षांनंतर ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वीरीत्या आयोजित करण्यात त्यांची मोलाची भूमिका होती.
मान्यवरांचे आभार
या पुरस्काराबद्दल कुलकर्णी यांनी महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मराठी भाषा मंत्री उदय सामंत तसेच निवड समितीचे आभार मानले आहेत.
तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, खा. श्री.छ. उदयनराजे भोसले, रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले, विधानपरिषद उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, ज्येष्ठ मार्गदर्शक रवींद्र बेडकिहाळ, मसापचे सर्व जिल्हा प्रतिनिधी, सर्व शाखांचे प्रमुख, मसाप पुणे शाहूपुरी शाखा, मावळा फौंडेशन आणि सातारा जिल्ह्यातील सर्व सहकाऱ्यांविषयी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
“कामच बोलते, हे या पुरस्कारामुळे सिद्ध झाले असून पुढेही अशीच अभिमानास्पद कामगिरी करत राहीन,” अशी ग्वाही विनोद कुलकर्णी (कोषाध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे) यांनी दिली.
