
नांदगाव (प्रतिनिधी) : बदलत्या पत्रकारितेतील आव्हाने स्वीकारून विश्वासार्हता जपणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार किरण नाईक यांनी केले.ते मनमाड येथे पल्लवी मंगल कार्यालयात नांदगाव–मनमाड पत्रकार संघाच्या वतीने व स्व.प्रकाशजी छगनलाल गोयल यांच्या . स्मरणार्थ, साप्ता.मनमाड ठिणगी,कंचन ज्वेलर्स ,गोयल परिवार आयोजित जीवनगौरव व पत्रकार सन्मान सोहळ्यात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.

दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी अमोल खरे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्रस्ताविकात त्यांनी पत्रकार संघ ही कुटुंबसंस्था असल्याचे सांगत, संघटित पत्रकारितेचे महत्त्व अधोरेखित केले.

किरण नाईक यांनी सांगितले की, पूर्वीची पत्रकारिता समाजाभिमुख होती, आज मात्र पॅकेजवर चालणारी पत्रकारिता वाढत आहे. पत्रकार कधी वाकत नाही, कधी थकत नाही, म्हणून त्याचा सन्मान होणे गरजेचे आहे. मात्र अभ्यासपूर्ण, संदर्भयुक्त बातम्यांचा अभाव असून पत्रकारच पत्रकारितेचा सन्मान कमी करत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. राजकारण आणि गुन्हेगारीचे वाढते समीकरणही गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले.

मनोगत व्यक्त करताना भास्कर कदम यांनी नांदगाव–मनमाड पत्रकार संघाच्या कार्याचे कौतुक करत, महाराष्ट्र स्तरावर मिळालेल्या पुरस्काराबद्दल समाधान व्यक्त केले. पत्रकारांनी दलालीपासून दूर राहून समाजाच्या प्रश्नांसाठी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

मोतिरामजी पिंगळे यांनी बदलते तंत्रज्ञान स्वीकारून नव्या पिढीने पत्रकारितेत प्रवेश करावा, असे मत मांडले. स्वातीताई गुजराथी यांनी पत्रकारितेची वाटचाल कठीण असूनही पुढील पिढी या क्षेत्रात येईल कि नाही अशी शंका व्यक्त केली.
या सोहळ्यात संदीप देशपांडे (महाराष्ट्र टाइम्स), जहुरखान जाबाज खान ( इंडिया टीव्ही), नरहरी उंबरे (पुण्यनगरी ), सोमनाथ घोंगाने (दै. स्वराज्य दूत) आणि सुरेश नारायणे ( गणतंत्र न्यूज ) यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कवी जनार्दन देवरे, नैवद्या बिद्री, राजू लहिरे, प्रियां निकुंभ परदेशी, बाबासाहेब बोरसे यांनी सन्मान पत्राचे वाचन केले.

तसेच उपस्थित सर्व पत्रकारांचाही प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री यांनी ऑनलाइन माध्यमातून पत्रकार संघाच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

तसेच तन्मय टिल्लू यांनी देखिल ऑनलाइन शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाली परदेशी व आनंद बोथरा यांनी केले. आभार अशोक बिद्री यांनी मानले.
या कार्यक्रमास पत्रकार संघातील कुटुंब परिवारासह मोठ्या प्रमाणात उपस्थित होती.
